Logo YouVersion
Îcone de recherche

योहान 11

11
मृत लाजराला जिवंत करणे
1बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या.
2ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता.
3म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”
4ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे.”
5मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती.
6म्हणून, तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला.
7त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.”
8शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?”
9येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो.
10परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.”
11हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”
12ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.”
13येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले.
14म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मेला आहे;
15आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा; तरी आपण त्याच्याकडे जाऊ.”
16तेव्हा दिदुम1 म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, “आपणही ह्याच्याबरोबर मरायला जाऊ.”
17येशू आला तेव्हा त्याला कळले की, त्याला कबरेत ठेवून चार दिवस झाले आहेत.
18बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती.
19तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.
20येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली.
21मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता;
22तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
23येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”
25येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल;
26आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?”
27ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”
28असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.”
29हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली.
30येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता.
31जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.
32मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
33येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला,
34आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.”
35येशू रडला.
36ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!”
37परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?”
38येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती.
39येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.”
40येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
41ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो.
42मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.”
43असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.”
44तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
45मरीयेकडे आलेल्या यहूद्यांनी येशूने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;
46पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले.
मुख्य याजक येशूला ठार मारण्याचा कट करतात
47ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो.
48आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.”
49तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही;
50प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.”
51हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे.
52आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता.
53ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्‍चय केला.
54ह्यामुळे येशू तेव्हापासून यहूदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला; आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला.
55तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांस शुद्ध करून घ्यायला बाहेरगावांहून वर यरुशलेमेस गेले.
56ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?”
57मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”

Sélection en cours:

योहान 11: MARVBSI

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi