हाग्गय 2
2
1सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी, हाग्गय संदेष्ट्याद्वारे याहवेहचे हे वचन आले: 2शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, यहूदीयाचा राज्यपाल व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक आणि देशातील अवशिष्ट लोकांशी बोल. त्यांना विचार, 3“या भवनाची पूर्वीची भव्यता कशी होती हे सांगण्यास तुमच्यातील कोणी उरले आहे काय? हे सध्याचे काहीच नाही असे तुम्हाला वाटते ना? 4परंतु हे जरूब्बाबेला, बलवंत हो. हे प्रमुख याजका यहोशुआ, यहोसादाकाच्या पुत्रा बलवंत हो. या देशातील सर्व लोकहो, बलवंत व्हा आणि कामाला लागा, याहवेह जाहीर करतात. कारण ‘मी तुम्हाबरोबर आहे,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. 5‘कारण तुम्ही इजिप्त देश सोडला, तेव्हाच मी तुम्हाला अभिवचन दिले होते की माझा आत्मा तुम्हामध्ये वास करेल. भिऊ नका.’
6“सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘थोड्या वेळात मी आकाश, पृथ्वी, सागर आणि कोरडी भूमी पुन्हा हलविणार आहे. 7मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 8‘रुपे माझे आहे व सोनेही माझे आहे,’ सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. 9सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.”
भ्रष्ट लोकांसाठी आशीर्वाद
10दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले: 11“सर्वसमर्थ याहवेहचे असे म्हणणे आहे: ‘याजकांना विचार नियमशास्त्र काय म्हणते: 12तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ”
त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.”
13मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?”
याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”
14नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात.
15“ ‘आता तुम्ही आजपासून#2:15 किंवा मागील दिवसांचा गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती. 16जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे. 17तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात. 18‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा: 19धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत.
“ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”
जरूब्बाबेल याहवेहच्या बोटातील मुद्रेची अंगठी
20त्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी याहवेहकडून हाग्गयला दुसऱ्यांदा वचन आले: 21“यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे. 22सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल.
23“ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”
Currently Selected:
हाग्गय 2: MRCV
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.