मार्क 7

7
परूश्यांचा वरपांगी सोवळेपणा
1तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले.
2त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते.
3परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत;
4बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्‍याच दुसर्‍या रूढी ते पाळतात.
5ह्यावरून परूश्यांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत?”
6त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा :
‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
7ते व्यर्थ माझी उपासना करतात,
कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात,
ते असतात मनुष्यांचे नियम.’
8तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]”
9आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे!
10कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’
11परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, ‘जे मी तुम्हांला पोषणासाठी द्यायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे,’
12तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही;
13अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता.”
अंतर्यामी भ्रष्टता
14तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्व जण माझे ऐका व समजून घ्या;
15बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही; तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते.
16ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
17तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले.
18तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हांला समजत नाही काय?
19कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते.” अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.
20आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते.
21कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात;
22जारकर्मे, चोर्‍या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा.
23ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात.”
येशू सुरफुनीकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी बरी करतो
24मग तो तेथून निघून सोर व सीदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते.
25पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
26ती बाई हेल्लेणी असून सुरफुनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की, “माझ्या मुलीतून भूत काढा.”
27तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.”
28मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.”
29तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
30मग ती आपल्या घरी गेली, तेव्हा मुलीला अंथरूणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
येशू बहिर्‍या-तोतर्‍या माणसाला बरे करतो
31नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सीदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला.
32तेव्हा लोकांनी एका बहिर्‍या-तोतर्‍या माणसाला त्याच्याकडे आणून, ‘आपण ह्याच्यावर हात ठेवा’ अशी त्याला विनंती केली.
33तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानांत बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला;
34आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, “इप्फाथा,” म्हणजे “मोकळा हो.”
35तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला.
36तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले.
37आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió