लूक 3
3
बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश
1तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;
2आणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखर्याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.
3मग तो यार्देनेजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.
4हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे -
“‘अरण्यात घोषणा करणार्याची
वाणी झाली ती अशी की,
परमेश्वराचा मार्ग तयार करा,’
त्याच्या ‘वाटा नीट करा;
5प्रत्येक खोरे भरेल,
प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल,
वाकडी सरळ होतील,
खडकाळीच्या वाटा सपाट होतील,
6आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’
7तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घेण्यास त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?
8आता पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
9आताच झाडांच्या मुळांशी कुर्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”
10तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारीत, “तर मग आम्ही काय करावे?”
11तो त्यांना उत्तर देई, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे.”
12मग जकातदारही बाप्तिस्मा घेण्यास आले व त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही काय करावे?”
13त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.”
14शिपायांनीही त्याला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.”
15तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करत असत;
16आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडण्यास मी योग्य नाही, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्या अग्नीत जाळून टाकील.”
18आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे.
19पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे,
20त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले.
येशूचा बाप्तिस्मा
21सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की, आकाश उघडले गेले,
22पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
येशूची वंशावळ
23येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा,
24तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मल्खीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा,
25तो मत्तिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा,
26तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा,
27तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरूब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा,
28तो मल्खीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा,
29तो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा,
30तो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकीमाचा,
31तो मलआचा, तो मिन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,
32तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा,
33तो अम्मीनादाबाचा, तो अरामाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा,
34तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा,
35तो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा,
36तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा,
37तो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा,
38तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.
S'ha seleccionat:
लूक 3: MARVBSI
Subratllat
Comparteix
Copia

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.