रोमकरांस 3
3
परमेश्वराचा विश्वासूपणा
1तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का? 2सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते.
3जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का? 4नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे:
“हे सारे तू पाहिले आहेस आणि म्हणून
माझ्याविरुद्ध तू दिलेला निकाल यथान्याय आहे.”#3:4 स्तोत्र 51:4
5परंतु जर आमच्या अनीतिमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहे का? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.) 6पण असे कदापि नाही! कारण मग परमेश्वर जगाचा न्याय कसा करतील? 7कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?” 8किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे!
नीतिमान कोणीही नाही
9तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही अगोदरच यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे. 10असे लिहिले आहे:
“कोणीही नीतिमान नाही, एकही नाही;
11समंजस असा कोणी नाही;
परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.
12प्रत्येकजण बहकला आहे;
सारे जण निरुपयोगी झाले आहेत.
योग्य करणारा कोणीच नाही,
एकही नाही.”#3:12 स्तोत्र 14:1-3; 53:1-3; उपदे 7:20
13“त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत”#3:13 स्तोत्र 5:9
त्यांच्या जिभा लबाडयांनी भरलेल्या आहेत.
“त्यांच्या जिभेवर सर्पाचे विष असते.”#3:13 स्तोत्र 140:3
14“त्यांची तोंडे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.”#3:14 स्तोत्र 10:7
15“रक्तपात करावयाला त्यांचे पाय उतावीळ असतात,
16दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
17आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.”#3:17 यश 59:7-8
18“त्यांना परमेश्वराविषयी कुठलेही भय वाटत नाही.”#3:18 स्तोत्र 36:1
19आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल. 20नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
विश्वासाद्वारे नीतिमत्त्व
21पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे. 22परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना दिली आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही, 23कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, 24आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामुल्य प्रकारे नीतिमान म्हणून जाहीर केले आहे. 25ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे. 26आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.
27तर मग आमचा गर्व कशासाठी? त्याला वगळण्यात आले आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे. 28आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही. 29किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच, 30परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात. 31आता आपण नियमशास्त्राला विश्वासाने निरुपयोगी करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
Currently Selected:
रोमकरांस 3: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.