YouVersion Logo
Search Icon

मत्तय 28

28
येशूंचे पुनरुत्थान
1शब्बाथ संपल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया कबर पाहावयला गेल्या.
2तेवढ्यात एकाएकी तीव्र भूकंप झाला, कारण स्वर्गातून प्रभूचा एक दूत खाली आला, कबरेजवळ जाऊन त्याने कबरेवरील धोंड बाजूला लोटली आणि तो तिच्यावर बसला. 3त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती. 4पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले.
5देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. 6ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा. 7आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा: ‘येशू मेलेल्यामधून पुन्हा उठले आहेत आणि ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. ते तिथे तुम्हाला भेटतील.’ जसे मी तुम्हाला सांगितले.”
8भयभीत पण अतिशय आनंदित होऊन त्या स्त्रिया कबरेपासून दूर गेल्या, शिष्यांना देवदूताचा निरोप सांगण्यासाठी त्या धावतच निघाल्या. 9अकस्मात येशू त्यांना भेटले व “अभिवादन” असे म्हणाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांची उपासना केली. 10मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”
पहारेकर्‍यांचे निवेदन
11त्या स्त्रिया वाटेवर असताना, काही शिपाई महायाजकाकडे गेले आणि काय घडले यासंबंधीचा सर्व वृतांत त्यांनी महायाजकांना सांगितला. 12यहूदी पुढार्‍यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन, 13त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले. 14राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.” 15या आश्वासनानंतर शिपायांनी लाच घेतली आणि त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आणि ही गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरली आणि ती आजही प्रचलित आहे.
महान आज्ञा
16यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले. 17त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला. 18मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. 19यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; 20आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”

Currently Selected:

मत्तय 28: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in