YouVersion Logo
Search Icon

2 करिंथकरांस 6

6
1परमेश्वराचे सहकारी या नात्याने आम्ही तुम्हाला विनवितो की परमेश्वराची कृपा व्यर्थ होऊ देऊ नका. 2कारण ते म्हणतात,
“माझ्या कृपेच्या समयी तुमची विनवणी माझ्या कानी आली.
तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य केले.”#6:2 यश 49:8
मी तुम्हाला सांगतो, आत्ताच परमेश्वराच्या कृपेचा समय आहे आणि आजच तारणाचा दिवस आहे.
पौलाचे कष्ट
3आम्ही कोणाच्याही मार्गात अडखळण होत नाही, जेणेकरून आम्ही करीत असलेली सेवा दोषी ठरविली जाऊ नये. 4आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो. 5आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास; 6शुद्धतेने, बुद्धिने, धीराने आणि करुणेने; पवित्र आत्म्याने आणि खर्‍या प्रीतिने भरलेले; 7सत्याचे भाषण, आणि परमेश्वराचे सामर्थ्य; उजव्या आणि डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे धारण करून करीत असतो. 8गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले; 9प्रसिद्ध तरी अप्रसिद्ध, मृत्यूच्या समीप परंतु जिवंत; घायाळ केलेले परंतु मृत्युपासून राखलेले 10व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत.
11करिंथकरांनो आम्ही तुमच्यापासून काहीच न लपविता आमचे हृदय तुमच्यासमोर मोकळे केले आहे. 12आमची प्रीती तोकडी नाही पण तुमची प्रीतिच संकुचित आहे. 13तुम्ही माझी स्वतःची मुले आहात असे समजून मी बोलत आहे. तुमची अंतःकरणेसुद्धा संपूर्णपणे उघडी करा.
मूर्तीपूजेविरुद्ध इशारा
14विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यांमध्ये काही भागीदारी आहे काय? 15तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का? 16आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे:
“मी त्यांच्यामध्ये राहीन
आणि त्यांच्यामध्ये चालेन;
मी त्यांचा परमेश्वर होईन
आणि ते माझे लोक होतील.”#6:16 लेवी 26:12; यिर्म 32:38; यहे 37:27
17यास्तव,
“त्यांच्यामधून निघा
त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा;
प्रभुने म्हटले आहे
त्यांच्या अमंगळ वस्तुंना स्पर्शही करू नका,
म्हणजे मी तुमचे स्वागत करीन.”#6:17 यश 52:11; यहे 20:34, 41
18आणि
“मी तुमचा पिता होईन
आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल
असे सेनाधीश प्रभू म्हणतात.”#6:18 2 शमु 7:14; 7:8

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in