प्रकटी 3
3
सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
1सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस! 2जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहे, ते सावरून धर कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत. 3म्हणून तू जे ऐकले व स्वीकारले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चात्ताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हेदेखील तुला कळणार नाही. 4मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत, अशी थोडी माणसे सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण तशी त्यांची योग्यता आहे. 5जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.
6पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!
फिलदेल्फिया येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
7फिलदेल्फिया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कुणाला बंद करता येत नाही आणि ज्याने बंद केल्यावर कुणाला उघडता येत नाही, तो असे म्हणतो - 8तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही! 9ऐक! जे सैतानाच्या समुदायात असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते तुझ्या पायांजवळ येऊन तुझी आराधना करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे, हे त्यांना कळून चुकेल, असे मी करीन. 10धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन. 11मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव. 12जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव मी त्याच्यावर लिहीन.
13पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!
लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
14लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो - 15तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! 16पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे! 17मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही, असे तू म्हणतोस, परंतु तू किती निकृष्ठ व तिरस्करणीय आहेस, हे तुला माहीत नाही! तू गरीब, आंधळा व उघडानागडा आहेस. 18म्हणून मी तुला स्रा देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू शुद्ध सोने माझ्याकडून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे. 19जितक्यांवर मी प्रेम करतो, तितक्यांचा निषेध करून मी त्यांना शिक्षा करतो. म्हणून तत्पर राहा आणि पश्चात्ताप कर. 20ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील. 21मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या राजासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन.
22पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!
Currently Selected:
प्रकटी 3: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.