YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 2

2
इफिस येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
1इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो - 2तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले. 3तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस. 4परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. 5तू कुठून पतन पावला आहेस, ह्याचा विचार कर व पश्चात्ताप करून पहिल्याप्रमाणे वागू लाग. तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. 6तरीही तुझा एक चांगला गुण म्हणजे माझ्याप्रमाणे तूदेखील निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. 7पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.
स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
8स्मुर्णा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
जो पहिला व शेवटचा, जो मरण पावला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो - 9तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे. 10तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नकोस. पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुगांत टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हांला हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.
11पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे!
जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.
पर्गम येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
12पर्गम येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो - 13सैतानाचे आसन आहे, तेथे तू राहतोस हे मला ठाऊक आहे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. जेथे सैतान राहतो, तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा तुमच्यामध्ये ठार मारला गेला, त्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. 14तथापि तुला काही गोष्टींविषयी दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. त्या ह्या की, बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे काही लोक तुमच्यामध्ये आहेत. त्यांनी बालाक ह्याला इस्राएली लोकांना मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व अनैतिक लैंगिक कृत्ये करणे, ही पापे करण्यासाठी प्रवृत्त केले. 15तसेच निकलाइतांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुमच्यामध्ये आहेत. 16म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन.
17पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे!
जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.
थुवतीरा येथील ख्रिस्तमंडळीला पत्र
18थुवतीरा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही:
ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चकचकीत सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो - 19तुझी कृत्ये, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुझ्या पहिल्या कार्यापेक्षा आता तुझे कार्य अधिक आहे, हे मला माहीत आहे. 20परंतु तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे, कारण ईजबेल नावाची जी स्त्री स्वतःला संदेश देणारी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस. 21तिने पश्चात्ताप करावा म्हणून मी तिला वेळ दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही. 22पाहा, मी तिला अंथरुणाला खिळवून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांना, तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चात्ताप न केल्यास भीषण संकटात पाडीन. 23मी तिच्या अनुयायांना ठार मारीन, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.
24थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, तुम्हांला सैतानाच्या तथाकथित गहन गोष्टी माहीत नाहीत. मी तुम्हांला सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. 25एवढेच करा की, जे तुम्हांला मिळाले आहे, ते मी येईपर्यंत दृढ धरून ठेवा. 26जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो, त्याला माझ्या पित्याकडून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन 27आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात, तसा तो लोहदंडाने त्याच्यावर अधिकार गाजवील. 28मी त्याला प्रभाततारादेखील देईन.
29पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे!

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in