YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 22

22
1नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. 2नदीच्या दोन्ही बाजूंस वर्षातून बारा वेळा फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. 3तिथे काहीही शापग्रस्त असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे सेवक त्याची उपासना करतील.
4ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. 5तिथे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज भासणार नाही, कारण प्रभू देव त्यांचा प्रकाश असेल आणि ते युगानुयुगे राज्य करतील.
येशूचे पुनरागमन
6नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”
7येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!”
8हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो. 9परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!” 10पुढे तो म्हणाला, “ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण हे सर्व घडण्याची वेळ जवळ आली आहे. 11दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”
12येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास मी वेतन घेऊन येईन. 13मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटचा, आदी व अंत आहे.”
14आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य! 15विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील.
16तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे.
17पवित्र आत्मा व वधू हेही म्हणतात, “ये.” हे ऐकणारा प्रत्येक जणदेखील म्हणो, “ये” आणि जो तहानलेला आहे व ज्याला हवे आहे त्याने यावे व जीवनाचे पाणी दान म्हणून स्वीकारावे.
समारोप
18ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी योहान इशारा देऊन सांगतो की, जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. 19तसेच जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.
20ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.”
आमेन. ये, प्रभू येशू, ये!
21प्रभू येशूची कृपा सर्वांबरोबर असो. आमेन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in