YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 21

21
नवे आकाश व नवी पृथ्वी
1नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. 2तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. 3मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल. 4तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”
5तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो!” तो मला असेही म्हणाला, “लिही, कारण ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत.” 6तो पुढे म्हणाला, “झाले! मी पहिला व शेवटचा, प्रारंभ व अंत आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी विनामूल्य देईन. 7जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. 8परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”
स्वर्गीय यरुशलेम
9नंतर शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत आला व म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.” 10तेव्हा मी आत्म्याने प्रभावित झालो. त्याने मला अतिशय उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. 11ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती. 12तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्राएलाच्या संतानाच्या बारा वंशांची होती. 13पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन, दक्षिणेकडे तीन व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. 14नगरीच्या तटाच्या पायासाठी शिला वापरल्या होत्या. त्यांवर कोकराच्या बारा प्रेषितांची बारा नावे होती. 15जो माझ्याबरोबर बोलत होता त्या देवदूताजवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याची काठी होती. 16ती नगरी चौरस होती. म्हणजेच तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला दोन हजार चारशे किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती. 17मग त्याने त्या नगरीच्या तटाचेदेखील माप घेतले. ते उंचीला साठ मीटर भरले. देवदूताच्या हाती असलेल्या प्रमाणभूत काठीने हे मोजमाप घेण्यात आले. 18तिचा तट सूर्यकांत रत्नाचा होता आणि नगरी नितळ काचेसारख्या शुद्ध सोन्याची होती. 19नगरीच्या तटाच्या पायाच्या शिला वेगवेगळ्या मौल्यवान रत्नांनी शृंगारलेल्या होत्या. पहिली शिला सूर्यकांत, दुसरी नीलमणी, तिसरी गोदंत, चौथी पाचू, 20पाचवी गोमेद, सहावी सादा, सातवी स्वर्णमणी, आठवी वैदूर्य, नववी पुष्कराज, दहावी सोनलसणी, अकरावी धूम्रकांत व बारावी चंद्रकांत अशा रत्नांच्या होत्या. 21बारा वेशी बारा मोत्यांच्या बनवलेल्या होत्या. एकेक वेस एकेक स्वतंत्र मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचा होता.
22त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय. 23नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप. 24राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. 25तिच्या वेशी दिवसा बंद होणार नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. 26राष्ट्रांचे वैभव व संपत्ती तिच्यात आणतील. 27मात्र त्या नगरीत कोणत्याही निषिद्ध गोष्टी, अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणार नाही. ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच ह्या नगरीत प्रवेश करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in