YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांना 2

2
पौलाचे सेवाकार्य
1चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो. मी माझ्याबरोबर तीतलाही घेतले होते. 2मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या शुभवर्तमानाची मी यहुदीतर लोकांत घोषणा करत असतो, त्याविषयी तेथील नेत्यांना एक खासगी सभा घेऊन निवेदन केले. माझे भूतकालीन किंवा वर्तमानकालीन सेवाकार्य व्यर्थ ठरू नये, म्हणून मी हे केले. 3माझा सहकारी तीत हा ग्रीक असता त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. 4काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती. 5शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याजवळ सुरक्षित राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही थारा दिला नाही.
6परंतु जे कोणी नेते म्हणून मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही, देव पक्षपात करीत नाही) त्यांनी माझ्या शुभवर्तमानात काही भर घातली नाही. 7उलट, ज्याप्रमाणे सुंता झालेल्या म्हणजेच यहुदी लोकांना शुभवर्तमान घोषित करण्याचे काम देवाने पेत्रावर सोपवले होते त्याचप्रमाणे सुंता न झालेल्या लोकांना म्हणजेच यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्याचे काम देवाने माझ्याकडे सोपवले आहे, हे त्यांनी ओळखले 8कारण जसे पेत्राला यहुदी लोकांकरिता प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते, तसे देवाच्या सामर्थ्याने मला यहुदीतर लोकांसाठी प्रेषित म्हणून नेमण्यात आले होते. 9मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे. 10मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती आणि मला तीच गोष्ट करण्याची उत्कंठा होती.
पेत्राचा निषेध
11पुढे पेत्र अंत्युखिया येथे आला तेव्हा तो खरोखर चुकत होता म्हणून मी त्याला उघडपणे विरोध केला. 12कारण याकोबकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो यहुदीतर लोकांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. 13त्याच्याबरोबर बाकीच्या यहुदी लोकांनीदेखील डरपोकपणा दाखवला. हे पाहून बर्णबाही त्यांच्याकडे ओढला गेला. 14शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे जेव्हा मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी पेत्राला म्हटले, “तू यहुदी असताही यहुदीतर लोकांसारखा वागतोस, यहुदी लोकांसारखा वागत नाहीस, तर यहुदीतर लोकांनी यहुदी लोकांसारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस, हे कसे?”
नियमशास्त्राची अपूर्णता
15आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही. 16तरीही मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते होत असते, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करावेत. नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यमात्रापैकी कोणीही हे करू शकत नाही. 17ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविले जात असता, आम्हीही पापी असलेले आढळून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? मुळीच नाही. 18नियमशास्त्राची जी व्यवस्था मी मोडून टाकली तीच मी पुन्हा उभारीत असलो, तर मी स्वतःला उ्रंघन करणारा ठरवतो. 19कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो. 20मला ख्रिस्ताबरोबर क्रुसावर चढविण्यात आले आहे आणि त्यामुळे ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे माझे जीवन आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता अर्पण केले. 21देवाच्या कृपेला निरर्थक ठरविणे मला मान्य नाही; कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्याद्वारे मिळते, तर ख्रिस्ताचे मरण अनावश्यक ठरते!

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in