गलतीकरांना 1
1
शुभेच्छा
1-2मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून:
गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला 3आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो.
4आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले. 5परमेश्वराचा युगानुयुगे गौरव असो!
हिरमोड
6मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याला सोडून तुम्ही इतक्या लवकर अन्य शुभवर्तमानाकडे वळत आहात. 7खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो. 8परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो! 9आम्ही अगोदर सांगितले, तसे आता पुन्हा सांगतो की, तुम्ही स्वीकारले त्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापित असो!
10मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो.
येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान
11बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही. 12कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे.
13यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या ख्रिस्तमंडळीचा निष्ठुरपणे छळ करत असे व तिचा विध्वंस करत असे. 14माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती.
15-16परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्ला न घेता 17आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिष्काला पुन्हा परत आलो. 18तीन वर्षांनंतर मी यरुशलेम येथे पेत्राला भेटायला गेलो व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. 19प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही.
20तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो.
21नंतर सूरिया व किलिकिया ह्या ठिकाणी मी गेलो.
22त्या वेळी ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील ख्रिस्तमंडळ्या मला व्यक्तिशः ओळखत नव्हत्या. 23त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, पूर्वी हा मनुष्य आपला छळ करायचा आणि ज्या विश्वासाचा व प्रभूमार्गाचा तो विध्वंस करू पाहत होता, त्याच विश्वासाची व प्रभूमार्गाची तो आता घोषणा करू लागला आहे 24आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचा गौरव केला.
Currently Selected:
गलतीकरांना 1: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.