YouVersion Logo
Search Icon

उत्प. 38

38
यहूदा आणि तामार
1त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुल्लाम नगरातील हिरा नावाच्या मनुष्याबरोबर त्याच्या घरी रहावयास गेला. 2तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले. 3ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले. 4त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले. 5त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला आणि त्याचे नाव शेला ठेवले. त्यास जन्म दिला होता तेव्हा ती कजीब नगरामध्ये राहत होती. 6यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी पत्नी शोधली. तिचे नाव तामार होते. 7परंतु यहूदाचा प्रथम जन्मलेला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता. परमेश्वराने त्यास ठार मारले. 8मग यहूदा ओनान याला म्हणाला, “तू तुझ्या भावाच्या पत्नीवर प्रेम कर. तिच्याबरोबर दिराचे कर्तव्य पार पाड, आणि तुझ्या भावाकरता तिला संतान होऊ दे.” 9ती मुले आपली होणार नाहीत, हे ओनानला माहीत होते. म्हणून जेव्हा तो त्याच्या भावाच्या पत्नीशी प्रेम करत असे, तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे, यासाठी की त्यास त्याच्या भावासाठी मूल होऊ नये. 10त्याने जे केले ते परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होते, म्हणून परमेश्वराने त्यास मारून टाकले. 11मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत तू तुझ्या वडिलाच्या घरी जाऊन तेथे विधवा म्हणून राहा.” कारण त्याने विचार केला, “नाही तर, तोसुद्धा आपल्या दोन भावांप्रमाणे मरून जाईल.” मग तामार आपल्या वडिलाच्या घरी जाऊन राहिली. 12बऱ्याच काळानंतर यहूदाची पत्नी, म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर यहूदा अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर आपली मेंढरे कातरायला वर तिम्ना येथे गेला. 13तेव्हा तामारेला कोणी सांगितले की, “पाहा, तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरता तिम्ना येथे जात आहे.” 14तिने आपली विधवेची वस्त्रे काढली आणि बुरखा घेऊन शरीर लपेटून घेतले. नंतर तिम्नाच्या रस्त्यावर एनाईम नगराच्या वेशीत ती बसून राहिली. कारण तिने पाहिले की, शेला आता प्रौढ झाला असूनही आपल्याला अजून त्याची पत्नी करून दिले नाही. 15यहूदाने तिला पाहिले, परंतु ती एक वेश्या असावी असे त्यास वाटले. तिने आपले तोंड झाकले होते. 16तेव्हा यहूदा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” ती आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते. ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?” 17यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक करडू पाठवून देईन.” ती म्हणाली, “परंतु ते पाठवून देईपर्यंत तुम्ही माझ्याजवळ काय गहाण ठेवाल?” 18यहूदा म्हणाला, “गहाण म्हणून मी तुझ्याकडे काय ठेवू?” तामार म्हणाली, “तुम्ही अंगठी, गोफ व हातातली काठी मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली. 19ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली. 20यहूदाने आपला मित्र अदुल्लामकर ह्याला आपल्या कळपातील करडू घेऊन त्या स्त्रीला तारण म्हणून दिलेल्या वस्तू आणावयास पाठवले, परंतु त्यास ती सापडली नाही. 21मग अदुल्लामकराने तेथील काही लोकांस विचारले, “येथे या एनाईमाच्या रस्त्यावर एक वेश्या होती ती कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.” 22तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सापडली नाही, तेथे राहणारे लोक म्हणाले की, ‘तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.’” 23यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे, नाहीतर आपलीच नालस्ती होईल. मी कबूल केल्याप्रमाणे तिला करडू देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपल्याला सापडली नाही.” 24या नंतर तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझी सुन तामार हिने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या व्यभिचारामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढा व जाळून टाका.” 25जेव्हा तिला बाहेर आणले तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला, “ज्या मनुष्याच्या मालकीच्या या वस्तू आहेत त्याच्यापासून मी गरोदर आहे.” पुढे ती म्हणाली, “ही अंगठी, गोफ आणि काठी कोणाची आहेत ते ओळख.” 26यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “माझ्यापेक्षा ती अधिक नीतिमान आहे. कारण मी तिला वचन दिल्यानुसार माझा मुलगा शेला याला ती पत्नी म्हणून दिली नाही.” त्यानंतर त्याने तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध केला नाही. 27तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती. 28प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.” 29परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस #अर्थ-मोडणाराअसे ठेवले. 30त्यानंतर त्याचा भाऊ, ज्याच्या हाताला लाल धागा बांधलेला होता, तो बाहेर आला आणि त्याचे नाव जेरह #सूर्योदयाचा लालसरपणाअसे ठेवले.

Currently Selected:

उत्प. 38: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in