YouVersion Logo
Search Icon

उत्प. 37

37
योसेफ आणि त्याचे भाऊ
1याकोब कनान देशात जेथे त्याचा बाप वस्ती करून राहिला होता त्या देशात राहिला. 2याकोबासंबंधीच्या घटना या आहेत. योसेफ सतरा वर्षांचा तरुण होता. आपल्या भावांबरोबर तो कळप सांभाळीत असे. तो आपल्या वडिलाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर होता. त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले. 3इस्राएल सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक सुंदर पायघोळ झगा बनवून दिला होता. 4आपला बाप आपल्या इतर भावांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करतो हे त्याच्या भावांना दिसले म्हणून ते त्याचा द्वेष करीत आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत नसत. 5योसेफास एक स्वप्न पडले. त्याने ते स्वप्न आपल्या भावांना सांगितले. त्यानंतर तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 6तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न कृपा करून ऐका: 7पाहा, आपण सर्वजण शेतात गव्हाच्या पेंढ्या बांधण्याचे काम करीत होतो, तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुम्हा सर्वांच्या पेंढ्या तिच्या भोवती गोलाकार उभ्या राहिल्या व त्यांनी माझ्या पेंढीला खाली वाकून नमन केले.” 8हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू आमचा राजा होऊन आमच्यावर राज्य करणार काय? आणि खरोखर तू आम्हावर अधिकार करशील काय?” त्याच्या या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे तर त्याचे भाऊ त्याचा अधिकच द्वेष करू लागले. 9नंतर योसेफाला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले: सूर्य, चंद्र व अकरा तारे यांनी मला खाली वाकून नमन केले.” 10त्याने आपल्या पित्यासही या स्वप्नाविषयी सांगितले. परंतु त्याच्या वडिलाने त्यास दोष देऊन म्हटले, “असले कसले हे स्वप्न आहे? तुझी आई, तुझे भाऊ व मी आम्ही भूमीपर्यंत लवून तुला नमन करू काय?” 11योसेफाचे भाऊ त्याचा हेवा करीत राहिले. परंतु त्याच्या वडिलाने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.
योसेफाला मिसर देशात विकून टाकतात
12एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले. 13इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपली मेंढरे चारावयास गेले आहेत ना? चल, मी तुला तेथे पाठवत आहे.” योसेफ त्यास म्हणाला, “मी तयार आहे.” 14तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला. 15योसेफ शेतात भटकत होता. पाहा, तो कोणा मनुष्यास दिसला. त्या मनुष्याने त्यास विचारले, “तू काय शोधत आहेस?” 16योसेफ म्हणाला, “मी माझ्या भावांना शोधत आहे, ते कोठे कळप चारीत आहेत, हे कृपा करून मला सांगता का?” 17तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. 18त्याच्या भावांनी योसेफाला दुरून येताना पाहिले आणि कट करून त्यास ठार मारण्याचे ठरवले. 19त्याचे भाऊ एकमेकांना म्हणाले, “हा पाहा, स्वप्ने पाहणारा इकडे येत आहे. 20आता चला, आपण त्यास ठार मारून टाकू आणि त्यास एका खड्ड्यात टाकून देऊ. आणि त्यास कोणा एका हिंस्र पशूने खाऊन टाकले असे आपल्या बापाला सांगू. मग त्याच्या स्वप्नांचे काय होईल ते आपण पाहू.” 21रऊबेनाने ते ऐकले आणि त्यास त्यांच्या हातातून सोडवले. तो म्हणाला, “आपण त्यास ठार मारू नये.” 22रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्त पाडू नका. त्यास रानातल्या या खड्ड्यात टाका, परंतु त्याच्यावर हात टाकू नका.” आपल्या भावांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावयाचे असा त्याचा बेत होता. 23योसेफ त्याच्या भावांजवळ येऊन पोहचला तेव्हा त्यांनी त्याचा सुंदर झगा काढून घेतला. 24नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते. 25ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते. 26तेव्हा यहूदा त्याच्या भावांना म्हणाला, “आपल्या भावाला ठार मारून आणि त्याचा खून लपवून ठेवून आपल्याला काय फायदा? 27चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू, आपण आपल्या भावावर हात टाकू नये. कारण तो आपला भाऊ आहे, आपल्याच हाडामांसाचा आहे.” त्याच्या भावांनी त्याचे ऐकले. 28ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी#230 ग्राम चांदी किंवा एका दासाची किंमत घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले. 29रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली. 30तो भावांकडे येऊन म्हणाला, “मुलगा कोठे आहे? आणि मी, आता मी कोठे जाऊ?” 31त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला. 32नंतर तो झगा आणून, आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हांला हा सापडला. हा झगा तुमच्या मुलाचा आहे की काय तो पाहा.” 33याकोबाने तो ओळखला आणि तो म्हणाला, “हा माझ्याच मुलाचा झगा आहे. हिंस्र पशूने त्यास खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यामध्ये संशय नाही.” 34याकोबाला आपल्या मुलाबद्दल अतिशय दुःख झाले, एवढे की, त्याने आपली वस्त्रे फाडली आणि कंबरेस गोणताट गुंडाळले आणि त्याने पुष्कळ दिवस आपल्या मुलासाठी शोक केला. 35याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला. 36त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.

Currently Selected:

उत्प. 37: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in