YouVersion Logo
Search Icon

अनु. 7

7
परमेश्वराची पवित्र प्रजा
निर्ग. 34:10-16
1जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल. 2तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका. 3त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका. 4कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा 5त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका. 6कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. 7परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. 8पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते. 9तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो. 10पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. 11तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद
लेवी. 26:1-13; अनु. 28:1-4
12मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील. 13तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हास देईल. 14इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील. 15परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील. 16तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल. 17ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका. 18त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा. 19त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील. 20याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल. 21तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे. 22त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील. 23पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हास साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल. 24परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल! 25त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका, कारण तो सापळाच आहे, त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. आपला देव परमेश्वर याला त्यांचा वीट आहे. 26त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.

Currently Selected:

अनु. 7: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in