YouVersion Logo
Search Icon

अनु. 6

6
सर्वात मोठी आज्ञा
1तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हास सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा दिल्या त्या या आहेत. जो प्रदेश तुम्ही वतन करून घेण्यासाठी यार्देनेच्या पैलतीरी जात आहात तेथे हे नियम पाळा. 2तुम्ही, तुमची मुले व नातवंडे या सर्वांनी आमरण आपला देव परमेश्वर याचे भय धरावे. त्याने घालून दिलेले नियम पाळावे, म्हणजे तुम्ही दीर्घायुषी व्हाल. 3इस्राएल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे कल्याण होईल. तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाट वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्वकाही मिळेल. 4हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. 5आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. 6मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. 7त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. 8त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. 9दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
आज्ञाभंगाविरुद्ध ताकीद
10अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हास हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हास मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हास देईल. 11उत्तम वस्तूंनी भरलेली घरे परमेश्वर तुम्हास देईल. तुम्हास खोदाव्या न लागलेल्या विहिरी परमेश्वर तुम्हास देईल. तुम्ही लागवड न केलेले द्राक्षांचे आणि जैतून वृक्षांचे मळे तुम्हास देईल. आणि मुबलक अन्नधान्याने तुम्ही तृप्त व्हाल. 12पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. 13तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका. 14तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका. 15कारण तुमच्यामध्ये असणारा तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. त्याच्या लोकांनी इतर दैवतांची पूजा केलेली परमेश्वरास आवडत नाही. भलत्याच दैवतांची तुम्ही पूजा केल्यास त्याचा कोप होईल. त्या क्रोधाने तो तुम्हास पृथ्वीच्या पाठीवरुन नष्ट करील. 16मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत#मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत , तसे इथे करु नका. 17तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळा. त्याच्या शिकवणीचे व नियमांचे पालन करा. 18उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हास द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यामध्ये तुमचा प्रवेश होऊन त्याचे वतन तुम्हास मिळेल. 19परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या शत्रूंना हुसकावून लावाल. 20आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. 21तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मिसरमध्ये फारोचे गुलाम होतो. परंतु परमेश्वराने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आम्हास तेथून बाहेर आणले. 22परमेश्वराने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरूद्ध मोठे प्रभावी चमत्कार करून दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. 23आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. 24ही सर्व शिकवण पाळायची आज्ञा परमेश्वराने आम्हास दिली आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे. मग तो आपल्याला कायम जिवंत ठेवील व आपले भले करील. 25जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल.

Currently Selected:

अनु. 6: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in