YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 10

10
इस्राएल लोकांच्या इतिहासावरून इशारा
1बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले. 2मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वाचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला. 3त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले. 4व ते एकच आत्मिक पेय प्याले कारण ते त्यांच्यामागून चालणाऱ्या खडकातून पीत होते आणि तो खडक ख्रिस्त होता. 5परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रेते अरण्यात पसरली होती. 6आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. 7त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.” 8ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. 9आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले. 10कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले. 11या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात 12म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. 13जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.
मूर्तीपूजेचा त्याग
14तेव्हा, माझ्या प्रियांनो, मूर्तीपूजा टाळा. 15मी तुमच्याशी बुद्धीमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा. 16जो “आशीर्वादाचा प्याला” आम्ही आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागीतेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? 17आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. 18देहासंबंधाने इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत नाही का? 19तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? 20नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही. 21तुम्ही देवाचा आणि भूतांचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही. 22आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.
23“काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत. 24कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे. 25मांसाच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकभावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा. 26कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही प्रभूचे आहे.” 27विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हास जेवावयास बोलावले आणि तुम्हास जावेसे वाटले तर विवेकभावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा. 28परंतु जर कोणी तुम्हास सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकभावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका. 29आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा आणि हेच फक्त एक कारण आहे कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सदविवेकबुद्धीने न्याय का व्हावा? 30जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो. 31म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा. 32यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका. 33जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.

Currently Selected:

1 करिं. 10: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in