YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 11

11
सभेत अप्रशस्त वर्तन
1मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा. 2मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता. 3परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे 4प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. 5परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. 6जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे. 7ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. 8पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. 9आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. 10ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. 11तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. 12कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत. 13हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? 14पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय? 15परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत. 16जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
प्रभूभोजनाचे भ्रष्टीकरण
17पण आताही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते. 18प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो. 19यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. 20म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभूभोजन घेत नाही. 21कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हातील प्रत्येकजण अगोदरच आपले स्वतःचे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा अतीतृप्त झालेला असतो. 22खाण्यापिण्यासाठी तुम्हास घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजवता? मी तुम्हास काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करू काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करत नाही.
प्रभू भोज
मत्त. 26:26-29; मार्क 14:22-25; लूक 22:14-23
23कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली, 24आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, “हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 25त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझी आठवण करण्यासाठी हे करा.” 26कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. 27म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. 28म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. 29कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. 30याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत. 31परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. 32परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये. 33म्हणून माझ्या बंधूनो व बहिणींनो जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा. 34जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही दंड मिळण्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करून देईन.

Currently Selected:

1 करिं. 11: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in