सफन्या 3
3
यरुशलेमेचे पाप व तिचा उद्धार
1ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो!
2तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.
3तिच्यातले तिचे सरदार गर्जना करणारे सिंह आहेत, तिचे न्यायाधीश संध्याकाळी बाहेर पडणारे लांडगे आहेत, ते सकाळपर्यंत काही शिल्लक राहू देत नाहीत.
4तिचे संदेष्टे बढाईखोर व विश्वासघातकी आहेत; तिचे याजक पवित्रस्थान भ्रष्ट करतात, त्यांनी नियमशास्त्राचे अतिक्रमण केले आहे.
5तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.
6“मी राष्ट्रे नष्ट केली आहेत, त्यांचे बुरूज उद्ध्वस्त केले आहेत; मी त्यांचे रस्ते उजाड केले आहेत, तेथून कोणी जात-येत नाही; त्यांची नगरे उद्ध्वस्त केली आहेत, कोणी माणूस, कोणी रहिवासी तेथे उरला नाही.
7मी म्हणालो, ‘तिने माझे भय मात्र धरावे, बोध घ्यावा, म्हणजे तिच्यासंबंधाने मी जे काही ठरवले आहे त्यानुसार तिची वस्ती नष्ट होणार नाही.’ पण त्यांनी आपली सर्व दुष्कर्मे नेटाने चालवली.”
8परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.
9तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने1 करतील.
10कूशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील, ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील.
11ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.
12मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.
13इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”
14सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर.
15परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.
16त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस.
17परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.
18जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे.
19पाहा, त्या समयी तुला पिडणार्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन.
20त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”
Currently Selected:
सफन्या 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.