YouVersion Logo
Search Icon

सफन्या 2

2
भोवतालच्या राष्ट्रांचा नाश
1हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये;
2निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुमच्यावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या.
3देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्‍यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.
4कारण गज्जाचे विस्मरण पडेल, अष्कलोन रान बनेल, अश्दोदास भर दुपारी हाकून देतील, एक्रोनावर नांगर फिरेल.
5समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.
6समुद्रतीरींच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यांत मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील.
7तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.
8“यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन-वंशजांनी केलेली निर्भर्त्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा तोरा मिरवला आहे.”
9म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”
10त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल.
11परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.
12अहो कूशाच्या रहिवाशांनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.
13तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.
14गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,
15हीच ती उल्लासी, निर्धास्त असलेली नगरी! ती आपल्या मनात म्हणत असे की मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही; ती कशी ओसाड, पशू बसण्याची जागा झाली आहे! तिच्याजवळून जाणारा प्रत्येक जण तिची छीथू करील व तिच्याकडे हातवारे करील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in