प्रकटी 19
19
स्वर्गात जयोत्सव व कोकर्याचे लग्न
1ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली,
“‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य
ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत;
2कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध
सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत;
ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने
पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा
त्याने केला आहे,
आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल
तिचा सूड घेतला आहे.”’
3ते दुसर्यांदा म्हणाले,
“हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.”
4तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!”
5इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली,
“अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्या
सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’
6तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला,
“‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव
ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे.
7आपण आनंद’ व ‘उल्लास करू’
व त्याचा गौरव करू;
कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे,
आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे,
8तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र
नेसायला दिले आहे;”
ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.
9तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”
10तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे.
विजयशाली ख्रिस्त
11‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.
12‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.
13रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणिदेवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;
14स्वर्गातील सैन्ये पांढर्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.
15त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’
16त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर
राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू
हे नाव लिहिलेले आहे.
त्याच्या शत्रूंचा नाश
17नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले; तो अंतराळातील मध्यभागी ‘उडणार्या सर्व पाखरांना’ उच्च वाणीने ‘म्हणाला, “या’, देवाच्या मोठ्या ‘जेवणावळीसाठी एकत्र व्हा;
18राजाचे’ मांस, सरदारांचे मांस, ‘बलवानांचे मांस, घोड्यांचे’ व त्यांवरील स्वारांचे मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे, अशा सर्वांचे मांस ‘खाण्यास’ या.”
19तेव्हा ते श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास ‘एकत्र झालेली’ मी पाहिली.
20मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;
21बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली.
Currently Selected:
प्रकटी 19: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.