YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 18

18
मोठ्या नगरीचा अधःपात
1त्यानंतर मी दुसर्‍या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता; ‘आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.’
2तो जोरदार वाणीने म्हणाला,
“‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’
व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय
व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय
अशी झाली आहे.
3कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस
सर्व राष्ट्रे प्याली आहेत;
पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले
व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास
खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”
4मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली;
ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’
तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये
आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा
होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’
5कारण तिच्या ‘पापांची रास
स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे;
आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे.
6‘जसे तिने दिले तसे तिला द्या,
तिच्या कर्माप्रमाणे’ तिला दुप्पट द्या;
तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट
तुम्ही तिच्यासाठी त्यात ओता.
7ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग
घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या;
कारण ती ‘आपल्या मनात म्हणते,
मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही;
मी दुःख पाहणारच नाही.’
8ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख
व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’
आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल;
कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव
‘सामर्थ्यवान’ आहे.”
9‘पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता ‘रडतील व ऊर बडवून घेतील.’
10ते म्हणतील, “अरेरे! ‘बाबेल ही मोठी नगरी होती! बलाढ्य नगरी होती!’ एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे.”
11पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिच्यासाठी ‘रडतात व शोक करतात;’ कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही;
12सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अति मोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे;
13दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.
14“ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला
चटक लागली आहे, ती तुझ्यापासून गेली आहे;
आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ
हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत;
ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत!”
15तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी रडत व शोक करत’ तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील;
16आणि म्हणतील,
“अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे,
जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली,
सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!
17एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली.”
सर्व ‘तांडेल’ गलबतांवरून बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर ‘उभे राहिले,’
18आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, “ह्या मोठ्या नगरी‘सारखी कोणती’ नगरी आहे?”
19‘त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत,
शोक करत व आक्रोश करत’ म्हटले, अरेरे,
‘जिच्या’ धनसंपत्तीने ‘समुद्रातील गलबतांचे सगळे’
मालक ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी!
तिची एका घटकेत ‘राखरांगोळी झाली!’
20‘हे स्वर्गा’,
आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो,
तिच्याविषयी ‘आनंद करा;’
कारण देवाने तिला दंड करून
तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’
21नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले,
“‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’
झपाट्याने टाकली जाईल
‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’
22वीणा वाजवणारे, ‘गवई’,
पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा ‘नाद’
तुझ्यात ‘ह्यापुढे ऐकूच येणार नाही;’
कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर
तुझ्यात सापडणारच नाही;
‘आणि जात्याचा आवाज’ तुझ्यात ह्यापुढे
ऐकूच येणार नाही;
23‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही;
‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात
ह्यापुढे ऐकू येणारच नाही;
तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते;
आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली.
24तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे
व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे’ रक्त सापडले.”’

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in