YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 77

77
देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान
मुख्य गवयासाठी; यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे आसाफाचे स्तोत्र.
1मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; त्याने माझे ऐकावे म्हणून मी देवाला हाक मारीन.
2माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शरण गेलो; रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिला पडला नाही; माझा जीव सांत्वन पावेना.
3मी देवाचे स्मरण करून व्याकूळ होतो; मी ध्यान करू इच्छितो पण माझा जीव मूर्च्छित होतो.
(सेला)
4तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस; मी विव्हळ झालो आहे, मला बोलवत नाही.
5पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत.
6रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते; मी आपल्या मनात चिंतन करतो; माझा जीव विचारात पडला आहे की,
7“प्रभू सर्वकाळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाही काय?
8त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?
9देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?”
(सेला)
10“परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले.
11मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन.
12मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.
13हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?
14अद्भुत कृत्ये करणारा तूच देव आहेस; तू आपले सामर्थ्य लोकांत प्रकट केले आहेस.
15याकोब व योसेफ ह्यांची संतती म्हणजे तुझे लोक, ह्यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस.
(सेला)
16जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली.
17मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले.
18तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.
19समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत.
20मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 77