YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 35

35
शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, मला विरोध करणार्‍यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्‍यांशी लढ.
2ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा.
3भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्‍यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग.
4माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.
5ते वार्‍याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.
6त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.
7कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली.
8त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.
9मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील.
10माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”
11द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारतात.
12मी केलेल्या बर्‍याची फेड ते वाइटाने करतात; माझा जीव निराधार झाला आहे.
13मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली.
14तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो; आईसाठी शोक करणार्‍यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो.
15मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला; ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले; त्यांनी माझी निंदा एकसारखी चालवली.
16जेवणाला नावे ठेवणार्‍या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दांतओठ खाल्ले.
17हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव.
18मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.
19माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;
20कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्‍यांविरुद्ध ते मसलती करतात.
21माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”
22हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.
23हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.
24हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.
25“अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत.
26माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.
27माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.
28माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 35