YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 31

31
श्रद्धेसंबंधी साक्ष
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस; तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर,
2माझ्याकडे आपला कान लाव; मला सत्वर सोडव; तू माझा प्रबल दुर्ग हो; माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो.
3कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव.
4त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तू मला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस.
5तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवतो; हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहेस.
6निरर्थक मूर्तीला भजणार्‍यांचा मी द्वेष करतो; माझा भाव तर परमेश्वरावर आहे.
7मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.
8तू मला वैर्‍याच्या कोंडीत सापडू दिले नाहीस; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस.
9हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत.
10कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत; माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत.
11माझ्या सर्व शत्रूंमुळे माझी निंदानालस्ती होत आहे; माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांत माझी फार निर्भर्त्सना होत आहे; माझ्या ओळखीपाळखीच्या लोकांना माझे भय वाटत आहे; मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात.
12स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे.
13कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली.
14हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे; मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.”
15माझे दिवस तुझ्या हाती आहेत; माझ्या वैर्‍यांच्या हातातून, माझ्या पाठीस लागणार्‍यांपासून मला सोडव.
16तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड; तू आपल्या वात्सल्याने मला तार.
17हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस; कारण मी तुझा धावा केला आहे; दुर्जन लज्जित होवोत, ते अधोलोकात निःशब्द राहोत.
18नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.
19तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्‍यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्‍यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस.
20तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.
21परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले.
22मी तर अधीर होऊन म्हणालो, “मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे;” तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकलास.
23अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्वर विश्वास ठेवणार्‍यांचे रक्षण करतो; गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.
24अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 31