YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 30

30
मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती
गृहप्रवेशाच्या वेळी गायचे दाविदाचे संगीतस्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्‍यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस.
2हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस.
3हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस.
4अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा.
5त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.
6मी तर आपल्या संपत्काली म्हटले, “मी कधी ढळणार नाही.”
7हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो.
8हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला; परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो,
9“मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय?
10हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.”
11तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;
12ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये; हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in