YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 18

18
दाविदाने गाइलेले मुक्तिगीत
(२ शमु. 22:1-51)
मुख्य गवयासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद ह्याचे स्तोत्र; परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व वैर्‍यांच्या हातून व शौलाच्या हातून सोडवले त्या दिवशी तो जी वचने गीतरूपाने परमेश्वरापुढे बोलला ती ही :
1हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.
2परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.
3स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
4मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले.
5अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.
6मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.
7तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.
8त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते.
9आकाश लववून तो खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.
10तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले.
11त्याने आपणाला काळोखाने आच्छादून घेतले, त्याने आपणाला आकाशातील मेघमय अंधाराचा, दाट ढगांचा मंडप केला.
12त्याच्यापुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.
13परमेश्वराने आकाशात गर्जना केली, परात्पराची वाणी झाली, गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले.
14त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.
15तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.
16त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले.
17माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते.
18माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला.
19त्याने मला प्रशस्त स्थली बाहेर आणले; तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडवले.
20परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे मला फळ दिले; माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले.
21कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.
22त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही.
23मी त्याच्या दृष्टीने सात्त्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखले.
24म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.
25दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस;
26शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस,
27दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस;
28तू माझा दीप उजळतोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
29तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून धावत जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.
30देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे; परमेश्वराचे वचन कसास उतरले आहे; त्यांचा आश्रय करणार्‍या सर्वांची तो ढाल आहे.
31परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?
32तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो.
33तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो.
34तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात.
35तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.
36तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस, माझे पाय घसरले नाहीत.
37मी आपल्या वैर्‍यांच्या पाठीस लागून त्यांना गाठले; आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.
38मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.
39लढाईसाठी तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला; माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्याखाली चीत केलेस.
40तू माझ्या वैर्‍यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.
41त्यांनी ओरड केली तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.
42तेव्हा वार्‍याने उडणार्‍या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले,
43लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.
44माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली.
45परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटांतून कापत कापत बाहेर आले,
46परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझे तारण करणार्‍या देवाचा महिमा वाढो;
47त्याच देवाने मला सूड उगवू दिला, राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले.
48तोच मला माझ्या वैर्‍यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्‍यांवर तू माझे वर्चस्व करतोस, जुलमी मनुष्यांपासून मला सोडवतोस.
49म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.
50तो आपल्या राजाला मोठे विजय देतो; आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in