स्तोत्रसंहिता 147
147
यरुशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती
1परमेशाचे स्तवन करा,1 कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, आणि स्तोत्रे गाणे शुभच आहे.
2परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो.
3भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.
4तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो.
5आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे.
6परमेश्वर लीनांना आधार देतो; तो दुर्जनांना धुळीस मिळवतो.
7तुम्ही परमेश्वराचे उपकारस्मरण करून त्याची कीर्ती वर्णा; वीणेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा.
8तो मेघांनी आकाश आच्छादतो; तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो, डोंगरांवर गवत रुजवतो.
9तो पशूंना व कावळ्यांच्या कावकाव करणार्या पिलांना त्यांचे अन्न देतो.
10तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही.
11जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.
12हे यरुशलेमे, परमेश्वराचा गौरव कर; हे सीयोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर.
13कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
14तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो;
15तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
16तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो.
17तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
18तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते.
19तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो.
20कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 147: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.