YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 102

102
विपत्तीत धावा
व्याकूळ होऊन आपले गार्‍हाणे परमेश्वरापुढे मांडणार्‍या दीनाने करायची प्रार्थना
1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहचो.
2माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नकोस; तू आपला कान माझ्याकडे लाव; मी धावा करीन त्या दिवशी माझे सत्वर ऐक.
3माझे दिवस धुराप्रमाणे विरून जातात, माझी हाडे चुलीतल्या निखार्‍यासारखी गळून गेली आहेत.
4माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, कारण मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही.
5मोठ्याने कण्हून कण्हून माझी चामडी माझ्या हाडांना चिकटून गेली आहे;
6मी रानातल्या पाणकोळ्यासारखा झालो आहे. वैराण प्रदेशातील घुबडाप्रमाणे मी झालो आहे.
7मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणार्‍या चिमण्यासारखा मी झालो आहे.
8माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात; माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात.
9मी भाकरीप्रमाणे राख खाल्ली आहे; व माझ्या पाण्यात माझी आसवे मिसळली आहेत.
10ह्याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध; कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहेस.
11माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे.
12हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस; तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील.
13तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे;
14तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत तिची धूळधाण पाहून ते हळहळतात.
15राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भितील;
16कारण परमेश्वराने सीयोन पुन्हा बांधली आहे, तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे;
17त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे; त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.
18पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल; पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेशाचे स्तवन करील;
19कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली पाहिले; त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून
20बंदिवानांचे उसासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले;
21ह्यासाठी की त्यांनी सीयोनेत परमेश्वराच्या नावाची घोषणा करावी, व यरुशलेमात त्याची स्तुती गावी;
22परमेश्वराची उपासना करण्यास लोक व राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.
23त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली; त्याने माझे आयुष्य कमी केले.
24मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नकोस; तुझी वर्षे पिढ्यानपिढ्या चालत आहेत.”
25तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास; गगने तुझ्या हातचे कृत्य आहे.
26ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील.
27परंतु तू तोच आहेस, तुझ्या वर्षांना अंत नाही.
28तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 102