नीतिसूत्रे 2
2
ज्ञानार्जनाचे फायदे
1माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील,
2आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील,
3जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील,
4जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील,
5तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
6कारण ज्ञान परमेश्वर देतो; त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात;
7सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्यांना तो ढाल आहे;
8अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा.
9नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.
10कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल;
11विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील;
12म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणार्या मनुष्यांपासून, तो तुला दूर ठेवील;
13ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गांनी चालतात;
14त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो, दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते उल्लास पावतात;
15त्यांचे मार्ग वाकडे आहेत, त्यांच्या वाटा विपरीत आहेत.
16परस्त्रीपासून, मोहक भाषण करणार्या परस्त्रीपासून, ज्ञान तुझा बचाव करील;
17तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे;
18तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे, तिच्या वाटा मेलेल्यांकडे जातात;
19जे तिच्याकडे जातात त्यांच्यातून कोणी परत येत नाही, त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत;
20ह्यास्तव तू भल्यांच्या मार्गाने चालावे व नीतिमानांच्या रीतीचे अवलंबन करावे.
21कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील.
22दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्यांचे त्यातून निर्मूलन होईल.
Currently Selected:
नीतिसूत्रे 2: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.