नीतिसूत्रे 1
1
नीतिसूत्रांचे मोल
1इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे :
2ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे;
3सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत.
4भोळ्यांना चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे;
5ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा;
6बोधवचने व दृष्टान्त, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावीत; ह्यासाठी ही आहेत.
7परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.
आदेश आणि ताकीद
8माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;
9कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.
10माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस.
11ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू;
12त्यांना जिवंतपणीच अधोलोकाप्रमाणे गट्ट करू, गर्तेत गडप होणार्यांप्रमाणे सात्त्विकांना गिळून टाकू.
13आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील; आपली घरे लुटीने भरू;
14तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू;”
15तर माझ्या मुला, त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस; त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस.
16कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.
17एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय.
18ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात.
19धनाचा लोभ धरणार्या सर्वांची गती अशीच आहे; ते आपल्या मालकांचा जीव घेते.
ज्ञानाची विनंती
20ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते;
21गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते :
22“अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हांला कोठवर आवडणार? निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार?
23माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हांला कळवीन.
24मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत; मी आपला हात पुढे केला, पण कोणी लक्ष दिले नाही;
25तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अव्हेर केला, व माझा वाग्दंड मुळी जुमानला नाही;
26ह्यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन; तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन;
27वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील.
28तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही;
29कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला, आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही;
30त्यांनी माझ्या बोधाचा अव्हेर केला, त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखला;
31म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;
32कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल; मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते;
33पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”
Currently Selected:
नीतिसूत्रे 1: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.