नीतिसूत्रे 14
14
1प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.
2जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो.
3मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.
4बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते.
5विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही; खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो.
6निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते.
7मूर्ख मनुष्याच्या वार्यास जाऊ नकोस, कारण त्याच्या ठायी तुला ज्ञानाची वाणी आढळणार नाही.
8शहाण्याने आपला मार्ग जाणणे ह्यात त्याची सुज्ञता असते. पण मूढांची मूढता कपटरूप होय.
9मूर्खाला अपराध करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु सरळ जनांत परस्पर प्रेमभाव असतो.
10हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही.
11दुर्जनांचे घर कोसळते, सरळांचा तंबू चांगला राहतो.
12मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.
13हसतानादेखील हृदय खिन्न असते, आणि हर्षाचा शेवट दु:खात होतो.
14भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो.
15भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.
16सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो;
17शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्याचा लोक द्वेष करतात.
18भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.
19दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात.
20गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.
21जो आपल्या शेजार्याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय.
22दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्यांना दया व सत्य ही प्राप्त होतात.
23सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते.
24सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.
25खरा साक्षी लोकांचे प्राण सोडवतो; पण जो आपल्या मुखावाटे लबाडी उच्चारतो तो दगलबाजी करतो.
26परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.
27परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.
28प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो.
29ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.
30शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
31जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.
33बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते.
34नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते.
35शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्यांवर तो रुष्ट होतो.
Currently Selected:
नीतिसूत्रे 14: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.