YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 13

13
1सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही.
2तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वत: चांगले फळ भोगतो, पण कपटी इसमांच्या जिवाला बलात्काररूप फळ मिळते;
3जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते;
4आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.
5नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो.
6नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्‍यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते.
7कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काहीएक नसते; कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात तरी त्यांच्याजवळ बहुत धन असते;
8मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही.
9नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो.
10गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते.
11घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते.
12आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.
13वचन तुच्छ मानणारा स्वत:वर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणार्‍यास चांगले प्रतिफळ मिळते.
14सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवतो.
15समंजसपणाने कृपा संपादता येते, पण कपटी इसमांचा मार्ग खडतर असतो.
16प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो.
17दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे.
18बोधाचा अव्हेर करणार्‍याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो.
19इच्छातृप्ती जिवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे.
20सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.
21पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण नीतिमानांस कल्याणरूप प्रतिफळ मिळते.
22चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते.
23गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते; तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो.
24जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय.
25नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for नीतिसूत्रे 13