गणना 6
6
नाजीरांसंबंधी नियम
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांना असे सांग की, कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस, म्हणजे स्वतःला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला,
3तर त्याने द्राक्षारस व मद्य हे वर्ज्य करावे. द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये, द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये, एवढेच नव्हे तर ताजी किंवा सुकवलेली द्राक्षेसुद्धा खाऊ नयेत.
4जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियांपासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये.
5जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल, तितके दिवस त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नये; परमेश्वराला वाहून घेण्याचा त्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे आणि आपले केस वाढू द्यावे.
6जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
7त्याचा बाप, आई, भाऊ, बहीण ह्यांपैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये, कारण देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते.
8जितके दिवस तो आपल्याला वाहून घेईल तितके दिवस त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र राहावे.
9कोणी त्याच्याजवळ अकस्मात मरण पावले आणि त्यामुळे वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले त्याचे डोके विटाळले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या दिवशी त्याचे डोके मुंडावे, म्हणजे सातव्या दिवशी ते मुंडावे.
10आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शनमंडपाच्या दाराजवळ याजकाकडे आणावीत;
11याजकाने एकाचा पापबली व दुसर्याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते; म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे.
12मग परमेश्वराला वाहून घेतलेले आपले सर्व दिवस त्याने पुन्हा पाळावेत. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा; तरीपण त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावेत.
13नाजीराचा नियम हा : त्याचे नाजीरपणाचे दिवस पुरे झाले म्हणजे त्याला दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणावे;
14आणि त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावे; त्याने एक वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा, एक वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा अर्पावा;
15आणि टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या सपिठाच्या पोळ्या आणि तेल चोपडलेल्या बेखमीर चपात्या, आणि त्यांसोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणे अर्पण करण्यास आणावीत.
16हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावेत;
17आणि टोपलीभर बेखमीर भाकरींसहित परमेश्वराप्रीत्यर्थ मेंढ्याचे शांत्यर्पण करावे, आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ही याजकाने अर्पण करावीत.
18मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शनमंडपाच्या दाराजवळ मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावेत.
19नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके मुंडल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजवलेला फरा व टोपलीतील एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती घेऊन नाजीराच्या हातावर ठेवावी;
20मग याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे; ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यांसह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे; ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे.
21नाजीराचा नवस आणि आपणास परमेश्वराप्रीत्यर्थ जे अर्पण अर्पायचे त्याविषयीचा नियम हा. ह्याखेरीज त्याने ऐपतीप्रमाणे शक्य असेल ते द्यावे; केलेल्या नवसाप्रमाणे वाहून घेण्याच्या नियमाला अनुसरून त्याने वागावे.”
याजकांनी द्यायचा आशीर्वाद
22परमेश्वर मोशेला म्हणाला,
23“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा :
24‘परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
25परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो;
26परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो.’
27ह्या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
Currently Selected:
गणना 6: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.