YouVersion Logo
Search Icon

ईयोब 6

6
ईयोब आपल्या मित्रांना दोष देतो
1मग ईयोबाने उत्तर केले,
2“कोणी माझा खेद तोलावा, माझी विपत्ती ताजव्यांत घालावी!
3ती समुद्राच्या वाळूपेक्षा जड भरेल! म्हणूनच माझे बोलणे मर्यादेबाहेर गेले आहे.
4सर्वसमर्थाचे तीर माझ्या देहात शिरले आहेत, त्यांचे विष माझा जीव शोषून घेत आहे; ईश्वराकडून आलेली संकटे माझ्याविरुद्ध सज्ज झाली आहेत.
5रानगाढवाला गवत सापडते तेव्हा तो ओरडतो काय? बैलापुढे चारा असता तो हंबरतो काय?
6बेचव पदार्थ मिठाशिवाय खातात काय? अंड्याच्या पांढर्‍या बलकाला रुची असते काय?
7ज्या पदार्थांना मी स्पर्श करीत नसे ते माझा किळसवाणा आहार झाले आहेत.
8माझे मागणे मला मिळते, माझे अपेक्षित ईश्वर मला देता,
9ईश्वराची मर्जी लागून त्याने मला चिरडले असते, आपला हात लांब करून मला छेदून टाकले असते, तर किती बरे होते!
10तशाने माझी शांती झाली असती; बेसुमार पीडेतही मला हर्ष वाटला असता; कारण त्या पवित्र प्रभूच्या वचनांचा मी कधीही धिक्कार केला नाही.
11माझ्यात अशी काय शक्ती आहे की मी उमेद धरू? माझा असा काय परिणाम होणार आहे की मी धीर धरू?
12माझी शक्ती पाषाणाच्या शक्तीइतकी आहे काय? माझा देह पितळेचा आहे काय?
13मी अगदी लाचार, निरुपाय बनलो असून माझ्यातले कर्तृत्व अगदी नष्ट झाले आहे ना?
14गलित झालेल्यावर दया करणे हा मित्रधर्म आहे; न केल्यास तो सर्वसमर्थाचे भय सोडून द्यायचा.
15माझे बांधव ओढ्याप्रमाणे दगा देणारे झाले आहेत ते आटणार्‍या ओहोळाच्या पात्राप्रमाणे झाले आहेत;
16ते ओढे वितळणार्‍या बर्फाने गढूळ होतात; हिम त्यात मिश्रित असते;
17ते तापले म्हणजे आटून जातात; उष्णता होऊ लागली म्हणजे ते जागच्या जागी जिरून जातात.
18ते भ्रमून भ्रमून सुकून जातात, वैराण प्रदेशात वाहून नष्ट होतात,
19तेमाच्या प्रवाशांनी त्यांचा शोध केला; शबाच्या काफल्यांनी त्यांची अपेक्षा केली;
20पण त्यांच्या आशेची निराशा झाली; तेथे पोचून ते फजीत झाले.
21तसे तुम्हीही शून्यवत झाला आहात. विपत्ती पाहून तुम्ही भ्याला आहात.
22‘मला काही द्या, आपल्या संपत्तीतून मला काही भेट करा,
23शत्रूंच्या हातून मला सोडवा; उपद्रव देणार्‍यांच्या काबूतून मला मुक्त करा,’ असे काही मी तुम्हांला म्हटले होते काय?
24माझी समजूत करा म्हणजे मी उगा राहीन; मी कोठे चुकलो हे मला समजावून सांगा.
25सत्याची वाणी किती जोरदार असते! तुमच्या वाक्ताडनाचा काय उपयोग?
26तुम्ही शब्दाशब्दाला धरायला पाहता काय? निराश मनुष्याचे उद्‍गार केवळ वायफळ आहेत.
27तुम्ही तर पोरक्यावर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांचा क्रयविक्रय करण्यास चुकत नाही.
28आता माझ्याकडे नीट पाहण्याची मेहेरबानी करा; मी काही तुमच्यासमक्ष सहसा लबाडी करणार नाही.
29पुन्हा वाद करा; काही अन्याय होऊ देऊ नका; पुनरपि बोला; माझी नीतिमत्ता पूर्ववत स्थापित होईल.
30माझ्या जिव्हेच्या ठायी काही अन्याय आहे काय? माझ्या तोंडाला अधर्माची रुची कळत नाही काय?”

Currently Selected:

ईयोब 6: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in