YouVersion Logo
Search Icon

ईयोब 5

5
1“आता हाक मारून पाहा; कोणी तुला उत्तर देईल काय? कोणा पवित्र जनाकडे तू धाव घेशील?
2मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.
3मी मूढास मुळावलेले पाहिले; पण लागलेच मला त्याच्या वसतिस्थानाचा धिक्कार करावा लागला.
4त्याची मुलेबाळे उद्धाराला अंतरली आहेत; वेशीत त्यांचा चुराडा होतो; त्यांचा कोणी बचाव करणारा नाही.
5त्यांचे पीक क्षुधित लोक खाऊन टाकतात; काट्याकुट्यांतूनही ते ते काढून नेतात; सापळा त्यांच्या धनासाठी आ पसरतो.
6कारण विपत्ती मातीतून निघत नाही, आणि कष्ट भूमीतून उगवत नाही;
7पण ठिणग्या वर उडतात तसा मानव कष्ट भोगण्यासाठी जन्मास येतो.
8मी तर ईश्वराचा धावा केला असता; मी देवावर हवाला टाकला असता.
9तो अतर्क्य महत्कृत्ये करतो; तो अगणित अद्भुत कृत्ये करतो;
10तो पृथ्वीतलास उदक देतो, शेतांना पाणी पाठवतो;
11तो नीचावस्थ जनांस उच्च करतो; शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात.
12तो धूर्तांचे बेत निष्फळ करतो, त्यामुळे त्यांच्या हातून काही कार्यसिद्धी होत नाही.
13तो शहाण्यांस त्यांच्याच धूर्ततेने धरतो; कुटिलांच्या मसलतीचा तो त्वरित शेवट करतो.
14काळोख त्यांना भर दिवसा गाठतो, भर दुपारी ते जसे काय रात्रीच्यासारखे चाचपडतात.
15तो दीनांस बलवानांच्या मुखरूपी तलवारीपासून, त्यांच्या हातून वाचवतो.
16कंगालांस आशा उत्पन्न होते, अधर्म आपले तोंड बंद करतो.
17पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस;
18कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.
19तो तुला सहा संकटांतून सोडवील; सातांनी तुला काही अपाय होणार नाही.
20दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तलवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील.
21जिव्हाप्रहार होऊ लागला म्हणजे तू लपवला जाशील; विनाश प्राप्त झाला असता तू त्याला डगमगणार नाहीस.
22विनाश व दुष्काळ ह्यांना तू हसशील; पशूंचे भय तुला वाटणार नाही.
23मैदानातल्या पाषाणाशीही तुझा स्नेह होईल; वनपशू तुझ्याशी सलोखा करतील.
24तुझा डेरा शांतिसमाधानाचा आहे अशी तुला प्रतीती येईल; तू आपल्या घरादाराकडे पाहशील तेव्हा तुला काही उणे नाही असे दिसून येईल.
25तुझा वंश वृद्धी पावेल, जमिनीवरच्या हरळीसारखे तुझे संतान वाढेल, असे तुला दिसून येईल.
26हंगामाच्या वेळी, धान्याची सुडी आणून ठेवतात, तसा तू पुर्‍या वयाचा होऊन कबरेत जाशील.
27पाहा, आम्ही शोध करून पाहिले ते हे आहे, हे तू ऐकून ध्यानात ठेव.”

Currently Selected:

ईयोब 5: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in