YouVersion Logo
Search Icon

ईयोब 40

40
1परमेश्वराने ईयोबाला आणखी म्हटले,
2“हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्‍याने आता उत्तर द्यावे.”
3मग ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले.
4“पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो.
5एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही; मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही.” देवाच्या सामर्थ्याचे मूर्त स्वरूप
6मग परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला :
7“आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला विचारतो, मला सांग.
8तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय?
9देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?
10तू आपणास महिमा व प्रताप ह्यांनी भूषित कर; तेज व ऐश्वर्य धारण कर.
11तुझ्या क्रोधाला भरते येऊ दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याची मानखंडना कर.
12प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टाला जागच्या जागी तुडव.
13त्या सर्वांना मातीस मिळव; त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
14मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करतो, अशी तुझी मीही प्रशंसा करीन.
15तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास1 पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो.
16पाहा, त्याच्या कंबरेत ताकद असते; त्याच्या पोटाच्या स्नायूंत सामर्थ्य असते.
17देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शेपूट हलवतो; त्याच्या जांघांचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात.
18त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज.
19तो देवाची प्रमुख कृती आहे; त्याच्या निर्माणकर्त्याने त्याला तलवारीने सज्ज केले आहे.
20डोंगर त्याला चारा पुरवतात; तेथे सर्व वनपशू क्रीडा करतात.
21तो कमलिनीखाली, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत पडून राहतो.
22कमलिनी त्याच्यावर छाया करतात; ओहोळातले वाळुंज त्याला घेरतात.
23पाहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही; यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो.
24तो सावध असता त्याला कोण धरील? पाशात पकडून त्याच्या नाकात वेसण कोण घालील?”

Currently Selected:

ईयोब 40: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in