ईयोब 39
39
तेव्हा त्यांना ते कोण देतो?
1पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय?
2त्यांचे महिने केव्हा भरतात ह्याचे गणित तुला करता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय?
3त्या ओणवून आपली पिले वितात; त्या प्रसूतिवेदनांपासून मुक्त होतात.
4त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात; ती त्यांना सोडून जातात, त्यांच्याकडे परत येत नाहीत.
5रानगाढवाला कोणी स्वैर फिरू दिले? त्याला बंधमुक्त कोणी केले?
6त्याचे निवासस्थान मी रुक्ष मैदानातील क्षारभूमी केले आहे.
7नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो; हाकणार्याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही.
8डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा; तो हरतर्हेची हिरवळ शोधत फिरतो.
9रानबैल तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय?
10त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्यातील जमीन कोळपील काय?
11त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय?
12तो तुझे धान्य घरी आणील व तुझ्या खळ्यातले धान्य जमा करील असा त्याचा तुला भरवसा आहे काय?
13शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात; तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय?
14ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते.
15ती कोणाच्या पायाखाली चिरडतील, किंवा कोणी वनपशू ती तुडवील, ह्याचे तिला भान नसते.
16ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्चिंत राहते;
17कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले आहे; तिच्या वाट्याला अक्कल आली नाही.
18ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडवत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते.
19घोड्याला बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणार्या आयाळीचे पांघरूण तू घालतोस काय?
20त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो.
21तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो.
22तो भीतीस हसतो, व घाबरत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही.
23भाता, चमकणारा भाला व बरची ही त्याच्यावर आपटून खणखणतात.
24तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो; रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो.
25रणशिंग जेव्हाजेव्हा वाजते तेव्हा तो ‘अहा!’ म्हणतो; लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द ह्यांचा वास तो दुरून काढतो.
26ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडवतो काय?
27गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय?
28तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो.
29तेथून तो आपले भक्ष्य निरखतो; त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते.
30त्याची पिले रक्त चाखतात; जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”
Currently Selected:
ईयोब 39: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.