ईयोब 36
36
देवाच्या माहात्म्याचे अलीहू वर्णन करतो
1अलीहू आपले भाषण पुढे चालवून म्हणाला,
2“अंमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे, असे मी तुला दाखवतो.
3मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन.
4माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत; हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझ्यापुढे उभा आहे.
5पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे.
6तो अधर्म्यांना वाचवत नाही; तो दीनांचा न्याय करतो.
7तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते.
8त्यांना बेड्यांनी जखडले, दुःखरूप रज्जूंनी त्यांना बांधून ठेवले,
9तर त्यांची कृती व त्यांचे अपराध ह्यांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यांना दाखवून देतो.
10त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करतो, आणि त्यांना अधर्म सोडायला सांगतो.
11हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील;
12पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील; ज्ञानप्राप्तीवाचून त्यांचा प्राणान्त होईल.
13जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात; त्याने त्यांना बांधले असता ते धावा करीत नाहीत.
14ते भरज्वानीत मरतात; त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो;
15तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो.
16तो तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडवून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो; तुझ्या मेजावर मिष्टान्नाची रेलचेल होईल.
17तू दुष्टांसारखा दोषारोप करीत राहशील; तर दोषारोप व न्यायदंड ह्यांच्या तावडीत तू सापडशील.
18आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नकोस; हा खंड भारी आहे म्हणून बहकू नकोस.
19तुझ्या अपार संपत्तीचा तुझ्या संपत्तीच्या सार्या बळाचा काही उपयोग होईल काय?
20लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नकोस.
21सांभाळ, दुष्टतेकडे वळू नकोस; ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे.
22पाहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्ये करतो; त्याच्यासमान शिक्षण देणारा कोण आहे?
23त्याला मार्ग लावून देणारा कोण आहे? ‘तू अधर्म केला आहे’ असे त्याला कोण म्हणणार?
24लोकांनी गायनरूपे त्याच्या करणीचा महिमा वर्णन केला आहे, त्या गाण्याचे स्मरण ठेव.
25सर्व माणसे ती करणी पाहत राहतात; मानव ती करणी दुरून पाहतो.
26पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.
27तो जलबिंदू आकर्षतो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात;
28मेघ त्यांची वृष्टी करतात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात.
29मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट ह्याचे ज्ञान कोणाला होईल?
30पाहा, तो आपणाभोवती प्रकाश पसरतो; त्याने समुद्रतल व्यापतो.
31ह्यांच्या योगाने तो राष्ट्रांचा न्याय करतो, अन्नाची विपुलता करतो.
32तो विद्युल्लता आपल्या हाती धरून तिने अचूक आघात करावा अशी तिला आज्ञा करतो.
33मेघगर्जना त्याच्या येण्याची खबर देते; गुरेढोरेही तो येत आहे असे कळवतात.
Currently Selected:
ईयोब 36: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.