यिर्मया 39
39
यरुशलेमेचा पाडाव
(२ राजे 24:20—25:21; २ इति. 36:17-21; यिर्म. 52:3-30)
1यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या मासी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमेवर चालून आले व त्यांनी त्याला वेढा घातला;
2सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले; अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की,
3बाबेलच्या राजाचे सर्व सरदार म्हणजे नेर्गल-शरेसर, समगार-नबो, सर्सखीम, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे वरकड सरदार हे सर्व मधल्या वेशीत येऊन बसले.
4हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे ह्यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटांमधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले; राजा अराबाच्या मार्गाने गेला.
5खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानात सिद्कियाला गाठले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्यापुढे आणले; त्याने त्याची शिक्षा ठरवली.
6रिब्ला येथे बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधले;
7आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले.
8खास्दी लोकांनी राजगृह व लोकांची घरे अग्नीने जाळली व यरुशलेमेचा कोट मोडून टाकला.
9तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.
10तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.
नबुखद्नेस्सर यिर्मयाची काळजी घेतो
11यिर्मयाविषयी तर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याला ताकीद केली की,
12“त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव; त्याला काही इजा करू नकोस; तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव.”
13तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने आणि नबूशजबान, रब-सारीस, नेर्गल-शरेसर, रब-माग व बाबेलच्या राजाचे सर्व मुख्य अंमलदार
14ह्यांनी माणसे पाठवून यिर्मयाला पहारेकर्यांच्या चौकातून काढले व घरी न्यावे म्हणून त्याला गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याच्या स्वाधीन केले; मग तो लोकांत जाऊन राहिला.
एबद-मलेखच्या मुक्तीचे वचन मिळते
15यिर्मया पहारेकर्यांच्या चौकात कैदी होता तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले ते असे :
16“जा, एबद-मलेख कूशी ह्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी आपल्या वचनाप्रमाणे ह्या नगराचे हित नव्हे तर अहित होईल असे करीन; त्या दिवशी तुझ्यादेखत ती वचने पूर्ण होतील.
17तुला तर त्या दिवशी मी मुक्त करीन, असे परमेश्वर म्हणतो; ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती तुला देणार नाहीत.
18मी खातरीने तुझा बचाव करीन; तू तलवारीने पडणार नाहीस, तू जिवानिशी सुटशील; कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे परमेश्वर म्हणतो.”
Currently Selected:
यिर्मया 39: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.