YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 38

38
यिर्मयाची विहिरीतून सुटका
1मग यिर्मयाने सर्व लोकांना जी वचने सांगितली ती शफाट्या बिन मत्तान, गदल्या बिन पशहूर, युकाल बिन शलेम्या व पशहूर बिन मल्कीया ह्यांनी ऐकली, ती ही :
2“परमेश्वर म्हणतो, जो ह्या नगरात राहील तो तलवारीने, दुष्काळाने व मरीने मरेल; पण जो खास्द्यांकडे जाईल तो जगेल, तो जिवानिशी सुटेल.
3परमेश्वर म्हणतो, हे नगर खातरीने बाबेलच्या राजाच्या सैन्याच्या हाती जाईल व तो ते घेईल.”
4मग सरदार राजाला म्हणाले, “ह्या मनुष्याला जिवे मारा; कारण असले भाषण करून ह्या नगरात राहिलेल्या योद्ध्यांचे व सर्व लोकांचे हात तो निर्बळ करतो; हा मनुष्य ह्या लोकांचे हित नव्हे तर नुकसान करायला पाहतो.”
5तेव्हा सिद्कीया राजा म्हणाला, “पाहा, तो तुमच्या हाती आहे; राजाला तुमच्या मर्जीविरुद्ध काही करता येत नाही.”
6मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.
7त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता.
8एबद-मलेख राजगृहातून निघाला व राजाकडे जाऊन म्हणाला,
9“स्वामीराज, ह्या लोकांनी यिर्मया संदेष्ट्याला जे सर्व केले ते फार वाईट केले; त्यांनी त्याला विहिरीत टाकले; तो आहे तेथे उपासमार होऊन मरेल, कारण नगरात काही अन्न उरले नाही.”
10तेव्हा राजाने एबद-मलेख कूशी ह्याला आज्ञा केली की, “येथून तीस1 माणसे बरोबर घेऊन जा आणि यिर्मया संदेष्ट्याला मृत्यू प्राप्त झाला नाही तोच त्याला विहिरीतून बाहेर काढ.”
11एबद-मलेख बरोबर माणसे घेऊन खजिन्याच्या राजगृहात गेला; तेथून त्याने जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या घेतल्या, आणि दोरांनी त्या विहिरीत यिर्मयाकडे पोहचवल्या.
12एबद-मलेख कूशी यिर्मयाला म्हणाला, “ही जुनीपुराणी फडकी व कुजट चिंध्या दोरांच्या आत ठेवून आपल्या बगलांखाली लाव.” यिर्मयाने तसे केले.
13तेव्हा त्यांनी यिर्मयाला दोरांनी विहिरीतून वर ओढून घेतले. मग यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.
सिद्कीया यिर्मयाचा सल्ला घेतो
14नंतर सिद्कीया राजाने यिर्मया संदेष्ट्याला बोलावणे पाठवून परमेश्वराच्या मंदिराच्या तिसर्‍या द्वाराच्या देवडीत आणवले. राजा यिर्मयाला म्हणाला, “मी तुला एक गोष्ट विचारतो; माझ्यापासून काही लपवू नकोस.”
15यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “मी आपणांला ती सांगितली तर आपण मला खरोखर मारून टाकणार नाही ना? मी आपणांला मसलत दिली तर आपण ती ऐकणार नाही.”
16सिद्कीयाने गुप्तपणे यिर्मयाला प्रतिज्ञापूर्वक म्हटले, “आमचा जीव ज्याने उत्पन्न केला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी तुला जिवे मारणार नाही व तुझा प्राण घेऊ पाहणार्‍या ह्या लोकांच्या हाती तुला देणार नाही.”
17मग यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “परमेश्वर, सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे गेलास तर तुझा जीव वाचेल व हे नगर अग्नीने जाळण्यात येणार नाही; तू व तुझे घराणे वाचेल;
18पण तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे न गेलास तर हे नगर खास्दी लोकांच्या हाती देण्यात येईल, ते नगर ते अग्नीने जाळतील व तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”
19सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “जे यहूदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”
20यिर्मया म्हणाला, “ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला विनवतो की, मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी आहे असे समजून ती पाळ, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल.
21पण तू निघून जाण्यास नाकबूल असलास तर परमेश्वराने मला प्रकट केलेले वचन हे आहे :
22पाहा, यहूदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांना बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, ‘तुझ्या जिवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असता ते निघून गेले आहेत.’
23तुझी सर्व बायकापोरे खास्द्यांकडे नेतील; तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस, बाबेलच्या राजाच्या हाती पडशील; तू हे नगर अग्नीने जाळण्यास कारण होशील.”
24सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “ही वचने कोणाला कळू देऊ नकोस, म्हणजे तू ठार व्हायचा नाहीस;
25पण मी तुझ्याबरोबर बोललो असे ऐकून सरदार तुझ्याकडे आले व तुला म्हणाले की, ‘तू राजाशी काय बोललास ते आम्हांला सांग; आमच्यापासून काही लपवू नकोस, आम्ही तुला ठार मारणार नाही; राजा तुला काय बोलला तेही सांग;’
26तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’
27मग त्या सर्व सरदारांनी यिर्मयाकडे येऊन विचारले, तेव्हा राजाने त्याला जे शब्द बोलण्याची आज्ञा केली होती त्या सर्व शब्दांनी त्याने त्यांना उत्तर दिले. ते त्याच्याबरोबर आणखी काही बोलले नाहीत; कारण त्यांना ही गोष्ट समजली नाही.
28ह्याप्रमाणे यरुशलेम हस्तगत होईपर्यंत यिर्मया पहारेकर्‍यांच्या चौकात राहिला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in