YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 30

30
बंदिवासातून सुटकेचे वचन
1परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :
2“परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो की जी वचने मी तुला सांगितली ती सर्व पुस्तकात लिहून ठेव.
3कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”
4परमेश्वराने इस्राएल व यहूदा ह्यांच्याविषयी वचने सांगितली ती ही :
5“परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही थरकाप झालेल्यांचा शब्द ऐकला आहे, दहशत आहे, शांती नाही.
6कोणा पुरुषास प्रसववेदना होत आहेत की काय, हे विचारा; पाहा, प्रत्येक पुरुष प्रसवणार्‍या स्त्रीप्रमाणे कंबरेला हात देऊन उभा आहे व प्रत्येकाचे तोंड फिक्के पडले आहे असे माझ्या दृष्टीस का पडत आहे?
7हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.
8सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;
9तर परमेश्वर त्यांचा देव ह्याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ते सेवा करतील.
10परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही.
11कारण तुझा उद्धार करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो; कारण ज्या राष्ट्रांतून मी तुझी पांगापांग केली आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन, पण तुझा पूर्ण नाश करणार नाही; तरी मी तुला योग्य शासन करीन, तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.
12कारण परमेश्वर म्हणतो, तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाय भारी आहे.
13तुझी दाद लावणारा कोणी नाही; तुझ्या घायास उपचार नाही, मलमपट्टी नाही.
14तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.
15तू आपल्या घायामुळे का ओरडतेस? तुझी जखम असाध्य आहे; तुझ्या घोर दुष्कर्मांमुळे तुझी पातके फार झाली आहेत; म्हणून मी तुला हे सर्व केले आहे.
16तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.
17मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’
18परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.
19त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.
20त्यांच्या मुलांची स्थिती पूर्ववत होईल, त्यांची मंडळी माझ्यासमोर स्थिर राहील, त्यांच्यावर जुलूम करणार्‍यांना मी शासन करीन.
21त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल, त्यांचा नियंता त्यांच्यातूनच निघेल; मी त्याला जवळ आणीन म्हणजे तो माझ्यासन्निध येईल, कारण माझ्यासन्निध येण्याचा कोणाच्या मनाला हिय्या झाला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
22तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन.”
23पाहा, परमेश्वरापासून क्रोधरूप तुफान सुटले आहे; धुव्वा उडवणारी वावटळ दुष्टांच्या डोक्यावर आदळेल.
24परमेश्वर आपले कार्य संपवीपर्यंत व आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत त्याचा संतप्त क्रोध मागे फिरणार नाही; हे पुढील काळात तुम्हांला समजेल.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 30