YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 29

29
यिर्मयाचे बंदिवान लोकांना पत्र
1मग पकडून नेलेल्या लोकांतील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुखद्नेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते त्या सर्वांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठवले.
2यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठवले.
3ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता :
4“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो :
5तुम्ही घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा;
6बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.
7तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.
8कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ ह्यांनी तुम्हांला फसवू नये; तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका.
9कारण ते माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
10परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन.
11परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.
12तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन.
13तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन.
14परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.
15तुम्ही म्हणता की, ‘परमेश्वराने बाबेलात आमच्यासाठी संदेष्टे उत्पन्न केले;’
16पण दाविदाच्या सिंहासनावर बसलेल्या राजांविषयी व ह्या नगरात राहणारे सर्व लोक, म्हणजे अर्थात तुमचे बांधव तुमच्याबरोबर बंदिवान होऊन गेले नाहीत त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो :
17पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत.
18मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील.
19परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत; आणि तुम्हीही ती ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो.
20बंदिवासातले लोकहो, ज्या तुम्हांला मी यरुशलेमेहून बाबेलास पाठवले ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका.
21‘कोलायाचा पुत्र अहाब आणि मासेयाचा पुत्र सिद्कीया हे माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन; व तो त्यांना तुमच्या डोळ्यांदेखत वधील.
22त्यांच्यावरून बाबेलात असलेल्या यहूदाच्या होऊन गेलेल्या सर्व बंदिवान लोकांमध्ये हा शाप प्रचारात येईल की, ‘बाबेलच्या राजाने सिद्कीया व अहाब ह्या दोघांना अग्नीने जाळले तसे परमेश्वर तुझे करो.’
23कारण त्यांनी इस्राएलात मूर्खपणा केला आहे, त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या बायकांबरोबर जारकर्म केले आहे, मी त्यांना आज्ञापली नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाम घेऊन सांगितली; मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’
24नेहेलमी शमाया ह्याला तू असे सांग,
25“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तू आपल्याच नावाने यरुशलेमेत असलेल्या सर्व लोकांना, मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्याला व सर्व याजकांना पत्रे पाठवून कळवले की,
26“परमेश्वराच्या मंदिरात आपण कारभारी व्हावे आणि जो कोणी वेडा होऊन आपणांला संदेष्टा म्हणतो त्याला खोड्यात घालून बेड्या घालाव्यात म्हणून परमेश्वराने यहोयादा याजकाच्या जागी तुला याजक केले आहे.
27तर यिर्मया अनाथोथकर तुमच्यासमोर आपणास संदेष्टा म्हणवतो त्याला तू प्रतिबंध का केला नाहीस?
28त्याने इकडे आम्हांला बाबेल येथे एक पत्र पाठवले, त्याचा आशय हा की बंदिवास दीर्घकाल राहील; तर घरे बांधा, त्यात वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा.”’
29हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले.
30तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की,
31“सर्व बंदिवासातल्या लोकांना हे सांगून पाठव की, ‘नेहेलमी शमाया ह्याच्यासंबंधाने परमेश्वर म्हणतो, मी शमायाला पाठवले नसून त्याने तुम्हांला संदेश दिला व खोट्या वचनावर भरवसा ठेवायला लावले,
32म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी नेहेलमी शमाया व त्याचे वंशज ह्यांना शिक्षा करीन; ह्या लोकांत राहून त्याचे नाव घ्यायला त्याचे कोणी उरणार नाही; मी आपल्या लोकांचे अनिष्ट करणार ते तो पाहणार नाही. कारण तो परमेश्वराविरुद्ध फितुरीचे शब्द बोलला आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यिर्मया 29