YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 16

16
परमेश्वराने केलेला लोकांचा न्याय
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे :
2“तू बायको करू नकोस व ह्या स्थळी तुला पुत्र व कन्या न होवोत.
3कारण ह्या देशात जन्मलेले पुत्र व कन्या ह्यांविषयी व ज्या माता त्यांना प्रसवल्या व ज्या पित्यांनी त्यांना जन्म दिला त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की,
4तीव्र यातना होऊन ती मरतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही व त्यांना कोणी पुरणार नाही; ती भूमीला खत होतील; त्यांचा तलवारीने व दुष्काळाने संहार होईल; त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य होतील.
5कारण परमेश्वर म्हणतो की : शोक करतात त्या घरात प्रवेश करू नकोस, विलाप करण्यास जाऊ नकोस, त्यांच्याविषयी खेद करू नकोस; कारण ह्या लोकांपासून मी आपली शांती काढून घेतली आहे, कृपा व दयादेखील काढून घेतली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
6ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.
7मृतांविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्यांच्यासाठी भाकरी मोडणार नाहीत; कोणाचे आईबाप मेले तर त्यांचे सांत्वन करण्यास कोणी त्यांच्यापुढे प्याला करणार नाहीत.
8ज्या घरात मेजवानी असेल त्यात जाऊ नकोस, त्यांच्याबरोबर खाण्यापिण्यास बसू नकोस.
9कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्‍याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन.
10तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, ‘परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्याविरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे?’
11तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही.
12तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे; कारण पाहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही.
13ह्याकरता जो तुम्हांला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही अशा देशात तुम्हांला ह्या देशातून घालवून देईन; तेथे तुम्ही रात्रंदिवस अन्य देवांची सेवा करीत राहाल; कारण मी तुमच्यावर कृपा करणार नाही.’
14परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही;
15तर ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना उत्तर देशातून व ज्या देशांत त्यांना त्याने हाकून लावले होते त्या देशांतून आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ’ असे म्हणतील; कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यात त्यांना मी परत आणीन.
16परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.
17कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.
18प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”
19हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.
20मानव आपणासाठी देव बनवील काय? असल्या वस्तू तर देव नव्हेतच!”
21म्हणून पाहा, मी त्यांना दाखवून देईन, माझे भुजबल व पराक्रम ही त्यांना एकदाची दाखवीन, म्हणजे माझे नाम परमेश्वर आहे असे ते जाणतील.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in