YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 15

15
यहूदावरील परमेश्वराचा न शमणारा कोप
1मग परमेश्वर मला म्हणाला, “मोशे व शमुवेल हे माझ्यापुढे उभे राहिले तरी माझे अंतःकरण ह्या लोकांकडे वळायचे नाही; त्यांना माझ्या दृष्टीसमोरून घालव, त्यांना निघून जाऊ दे.
2ते जर तुला म्हणतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तर त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, “जे मृत्यूसाठी नेमलेले आहेत त्यांनी मृत्यूकडे, जे तलवारीसाठी नेमलेले आहेत त्यांनी तलवारीकडे, जे दुष्काळासाठी नेमलेले आहेत त्यांनी दुष्काळाकडे व जे बंदिवासासाठी नेमलेले आहेत त्यांनी बंदिवासात जावे.”’
3“परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर चार गोष्टी आणीन : ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.
4यहूदाचा राजा हिज्कीया ह्याचा पुत्र मनश्शे ह्याने यरुशलेमेत जे काही केले त्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन.
5हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील?
6परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.
7मी त्यांना आपल्या देशाच्या वेशींवर सुपाने पाखडून टाकले, त्यांना अपत्यहीन केले; मी त्या लोकांचा विध्वंस केला, कारण ते आपल्या मार्गावरून मागे फिरले नाहीत.
8माझ्यासमोर त्यांच्या विधवा सागराच्या वाळूपेक्षा अधिक झाल्या आहेत; मी भरदुपारी त्यांच्यावर व तरुणांच्या मातेवर लुटारू आणतो; तिच्यावर क्लेश व त्रेधा ही अकस्मात ओढवतील असे मी करतो.
9सातपुती म्लान झाली आहे; ती प्राण सोडत आहे; भरदिवसा तिचा सूर्य मावळत आहे; ती लज्जित व फजीत होत आहे; त्यांचा अवशेष त्यांच्या वैर्‍यांसमक्ष मी तलवारीस बळी देईन, असे परमेश्वर म्हणतो.”
10अगे माझ्या आई! हायहाय! सर्व जगाबरोबर झगडा व विवाद करणार्‍या अशा मला तू जन्म दिला आहेस. मी कोणाशी वाढीदिढीचा व्यवहार केला नाही व कोणी माझ्याशी केला नाही; तरी सर्व मला शाप देतात.
11परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्‍यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन.
12कोणी लोखंड, उत्तरेहून आणलेले लोखंड व पितळ फोडू शकतो काय?
13“तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन.
14तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुमच्याविरुद्ध पेटला आहे.”
यिर्मयाला परमेश्वराचे आश्वासन
15हे परमेश्वरा, तू जाणत आहेस; माझे स्मरण करून मला भेट दे, माझ्याकरता मला छळणार्‍यांचा सूड घे! तू त्यांच्यासंबंधाने मंदक्रोध होऊन माझा संहार करू नकोस; तुझ्यासाठी मी निंदा सहन करतो ह्याचे स्मरण कर.
16मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली;1 तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो.
17विनोद करणार्‍यांच्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही; तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकान्ती बसलो; कारण तू मला अस्वस्थ केले आहेस.
18मला सतत दुःख का? माझी जखम भारी व असाध्य का? फसवणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, ह्यांसारखा तू खरोखर मला होशील काय?
19ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस.
20तुला ह्या लोकांनांबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन; म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील, तरी तुझ्यावर वरचढ होणार नाहीत; कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडवण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.
21मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्का-र्‍यांच्या तावडीतून मुक्त करीन.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in