YouVersion Logo
Search Icon

यशया 30

30
मिसरावर अवलंबून राहणे व्यर्थ
1परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;
2ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिसराच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिसराची वाट धरतात!
3म्हणून फारोचा आश्रय तुम्हांला लज्जेस कारण होईल, व मिसराच्या छायेत लपणे तुम्हांला फजितीस कारण होईल.
4त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत.
5तरी त्या लोकांबद्दल त्या सर्वांना लज्जा प्राप्त होईल, त्यांपासून त्यांना काही लाभ व्हायचा नाही, त्यांपासून त्यांना साहाय्य व उपयोग न होता लज्जा व अप्रतिष्ठा ह्या प्राप्त होतील.”
6दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.
7मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.
8तर आता चल, त्यांच्यासमक्ष हे पाटीवर लिही, टिपून ठेव म्हणजे ते पुढील पिढ्यांसाठी युगानुयुग राहील.
9कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत; ज्यांना परमेश्वराचे नियमशास्त्र ऐकायला नको अशी ही मुले आहेत.
10ते द्रष्ट्यांना म्हणतात, “दृष्टान्त पाहून नका”; संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्हांला यथार्थ गोष्टींचा संदेश सांगू नका, आम्हांला गोडगोड गोष्टी सांगा, कपटवचने सांगा;
11मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्यासमोरून इस्राएलाच्या पवित्र प्रभूस दूर करा.”
12ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;
13म्हणून एकाएकी कोसळून पडणार्‍या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हांला अकस्मात फळ मिळेल;
14कुंभाराच्या मडक्याचा सपाट्यासरसा चुराडा होतो आणि पडलेल्या तुकड्यात आगटीतून विस्तव घेण्यास किंवा हौदातून पाणी घेण्यास खापरीही सापडत नाही, तसा तो त्याचा चुराडा करील.”
15कारण प्रभू परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणाला, “मागे फिरणे व स्वस्थ राहणे ह्यांत तुमचा बचाव आहे; शांतता व श्रद्धा ह्यांत तुमचे सामर्थ्य आहे.” तरी तसे तुम्ही करीत नाही.
16तुम्ही म्हणाला, “नाही! आम्ही घोड्यावर बसून पळू,” म्हणून तुम्हांला पळावे लागेल; तुम्ही म्हणाला, “आम्ही चपळ घोड्यांवर बसू,” म्हणून तुमचा पाठलाग करणारे चपळ बनतील.
17एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.
देवाच्या लोकांना त्याच्या कृपेचे अभिवचन
18ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.
19सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील; तू इतःपर कधी शोक करणार नाहीस; तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझ्यावर कृपा करीलच; तो ऐकताच तो तुला पावेल.
20प्रभू तुम्हांला भाकरीची टंचाई व पाण्याची कमताई करील, तरी ह्यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत; तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील.
21“हाच मार्ग आहे; ह्याने चला,” अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल; मग तुम्हांला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो.
22तुमच्या रुपेरी कोरीव मूर्तींची मढवणी व तुमच्या सोनेरी ओतीव मूर्तींचा मुलामा तुम्ही अपवित्र लेखाल, एखाद्या अमंगळ वस्तूप्रमाणे त्या तुम्ही दूर फेकून द्याल; “चालती हो,” असे तुम्ही मूर्तीस म्हणाल.
23तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.
24शेतात राबणारे बैल व जवान गाढव ह्यांना दाताळ्याने उफणलेल्या व सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवण खायला मिळेल.
25मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरूज पडतील तेव्हा प्रत्येक उंच डोंगरावर व प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील.
26ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.
अश्शूराबाबत परमेश्वराचा न्याय
27पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्‍या अग्नीसारखी आहे;
28त्याचा श्वास दुथडी भरून वाहणार्‍या व गळ्यापर्यंत पोहचणार्‍या प्रवाहासारखा आहे, तो राष्ट्रांना नाशरूप चाळणीने चाळतो; भ्रांतिमूलक लगाम लोकांच्या जाभाडात आला आहे.
29सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल; परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्राएलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवत समारंभाने जाणार्‍याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल.
30तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.
31कारण परमेश्वर आपल्या दंडाने ताडन करील तेव्हा त्याच्या वाणीने अश्शूर भयकंपित होईल;
32आणि असे होईल की डफांचा व वीणांचा नाद होत असता परमेश्वर त्यांच्यावर नेमलेल्या दंडाचा प्रत्येक प्रहार करील व हात खालीवर करून त्यांच्याशी युद्ध करील.
33कारण पूर्वीच तोफेत (दहनस्थान) तयार केले आहे; ते राजासाठी सिद्ध केले आहे; ते खोल व रुंद केले आहे; त्याच्या चितेसाठी विस्तव व भरपूर लाकडे आहेत; गंधकाच्या धारेसारखा परमेश्वराचा फुंकर ती पेटवतो.

Currently Selected:

यशया 30: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in