YouVersion Logo
Search Icon

यशया 29

29
अरीएल व त्याचे शत्रू
1अरीएल1 ह्याला धिक्कार असो! दाविदाने तळ दिलेले अरीएल नगर ह्याला धिक्कार असो! ह्या वर्षात आणखी एक वर्ष मिळवा, सणांचा एक फेरा होऊ द्या.
2मग मी अरीएलांवर संकट आणीन; शोक व कण्हणे चालू होईल. तरीपण ते नगर मला अरीएलच असे होईल.
3मी तुझ्याभोवती वेढा घालीन व तुझी नाकेबंदी करून तुझ्यावर मोर्चे रचीन.
4तुला खाली पाडतील तेव्हा तू भूमीतून बोलशील; धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल; जमिनीतून भुतासारखा तुझा ध्वनी उठेल; धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल.
5तरी तुझ्या शत्रूंचा समुदाय रजःकणांसारखा होईल, तुला पिडणार्‍यांचा समुदाय उडणार्‍या भुसासारखा होईल; हे एका क्षणात, एकाएकी घडेल.
6मेघगर्जना, भूमिकंप, महानाद, वावटळ, तुफान व ग्रासणारी अग्निज्वाला ह्यांनी सेनाधीश परमेश्वर तुझा समाचार घेईल.
7अरीएलावर उठलेल्या सर्व राष्ट्रांचा समुदाय, अरीएल व त्याचा दुर्ग ह्यांवर हल्ला करून त्याला पीडा देणारे सगळे स्वप्नासारखे रात्रीच्या आभासासारखे होतील.
8कोणी भुकेला स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच; कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो मूर्च्छित व तहानेने व्याकूळ झालेला; तशीच सीयोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल.
इस्राएलाची दांभिकता व अंधत्व
9थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा; ते मस्त झाले आहेत पण द्राक्षारसाने नव्हत; ते झोकांडे खात आहेत पण मद्याने नव्हत.
10परमेश्वराने गाढ झोपेची धुंदी तुमच्यावर घातली आहे. तुमचे नेत्र बांधून टाकले आहेत, संदेष्टे व तुमचे प्रमुख जे द्रष्टे त्यांच्यावर पडदा टाकला आहे.
11सगळा दृष्टान्त तुम्हांला मोहोरबंद केलेल्या लेखातील शब्दांसारखा झाला आहे; तो लेख वाचणार्‍याकडे देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव,” तो म्हणतो, “हा मला वाचता येत नाही. कारण हा मोहोरबंद केलेला आहे,”
12ज्याला वाचता येत नाही अशाजवळ तो देऊन म्हणतात, “एवढे वाचून दाखव;” तो म्हणतो, “मला वाचता येत नाही.”
13प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.
14तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”
15जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;
16धिक्कार असो तुमच्या उलट्या समजाला! माती कुंभाराशी समान असे गणतील काय? “तू मला केले नाहीस” असे कर्त्याला कर्म म्हणेल का? “तुला अक्कल नाही” असे घडलेली वस्तू घडवणार्‍यास म्हणेल काय?
17लबानोनाची बाग होण्यास, बागेचे वन गणले जाण्यास थोडासा अवधी आहे, नाही काय?
18त्या दिवशी लेखातील शब्द बहिरे ऐकतील व अंधळ्यांचे डोळे काळोख व अंधार ह्यांपासून मुक्त होऊन पाहतील.
19नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल; लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील.
20कारण जुलमी नाहीतसे झाले आहेत; हेटाळणी करणारे आटोपले आहेत, वाइटाला जागणारे सर्व समूळ उच्छेद पावले आहेत.
21ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्ट वक्त्यासाठी जाळे पसरतात व नीतिमानास धडधडीत लबाडीने उलथून पाडतात;
22म्हणून अब्राहामाचा उद्धारकर्ता परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी म्हणतो, “ह्यापुढे याकोब लज्जायमान होणार नाही व त्याचा चेहरा फिका पडणार नाही.
23कारण त्याचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील तेव्हा ते माझे नाम पवित्र मानतील; याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र मानतील व इस्राएलाच्या देवाचे भय बाळगतील.
24भ्रांत मनाचे लोक सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे नीतिशिक्षण घेतील.”

Currently Selected:

यशया 29: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in