YouVersion Logo
Search Icon

होशेय 7

7
इस्राएलाचा अधर्म व बंड
1जेव्हा इस्राएलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राइमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते; ते दगा करतात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते.
2त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे हे ते लक्षात आणत नाहीत; आता त्यांच्याच कर्मांनी त्यांना घेरले आहे; ती माझ्या नजरेसमोर आहेत.
3ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारांना आपल्या लबाड्यांनी, खूश करतात.
4ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्‍याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो.
5आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले; त्याने आपला हात निंदकांच्या हातात घातला.
6कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे; त्यांचा कोप रात्रभर निद्रिस्त राहतो; तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.
7ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात; ते आपल्या अधिपतींना गिळून टाकतात; त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत; त्यांच्यातला कोणी माझा धावा करीत नाही.
8एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो; एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे.
9परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही.
10इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.
11एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.
12ते जातील तेव्हा त्यांच्यावर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन; त्यांच्या मंडळीने ऐकले आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.
13त्यांना धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून बहकले आहेत; त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे; त्यांना उद्धरावे अशी माझी इच्छा होती; ते माझ्याविषयी खोटेनाटे बोलले आहेत.
14त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.
15मी त्यांना शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात.
16ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्‍या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल.

Currently Selected:

होशेय 7: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in