YouVersion Logo
Search Icon

होशेय 2

2
परमेश्वराचे आपल्या बेइमान लोकांवरील प्रेम
1आपल्या बंधूंना ‘अम्मी’ (माझे लोक), आपल्या भगिनींना ‘रुहामा’ (दया पावलेल्या) म्हणा.
2“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;
3नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.
4तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जारकर्माची आहेत.
5त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्‍या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’
6ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन.
7ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’
8तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.
9म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.
10आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.
11तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.
12ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.
13बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.
14ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन.
15तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.
16परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.
17कारण मी तिच्या मुखातून बआलमूर्तींची नावे काढून टाकीन; ह्यापुढे तिला त्यांच्या नावांची आठवण उरणार नाही.
18त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.
19मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन.
20मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.
21परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;
22पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील.
23मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”

Currently Selected:

होशेय 2: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in